लोकसत्ता टीम

भंडारा : भंडाऱ्यात स्मशानघाटाकडे निघालेल्या अंत्ययात्रेत असं काही घडलं की नागरिक प्रेत सोडून पळाले. तिरडी घेऊन जाणाऱ्यांनीही ती खाली ठेवून वैनगंगा नदीत उड्या मारल्या.

स्मशानघाटावर अंत्यविधीसाठी निघालेल्या सुमारे दोनशे नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. सारेच जीवाच्या आकांताने पळू लागले. तिरडी घेऊन जाणाऱ्यांनीही ती खाली ठेवून वैनगंगा नदीत उड्या मारत मधमाशांपासून जीव वाचविला. तुमसर तालुक्याच्या सालई शिवारात रविवारी दुपारी दीड वाजतादरम्यान ही घटना घडली.

आणखी वाचा- दोन्ही खिशात पैसे तर एकाच खिशातील कसे लुटले? पोलिसांचा तर्क अन् बनाव उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाह्मणी येथील शुभम व मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी शनिवारी रात्री ८.३० वाजतादरम्यान थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन धडकली. गंभीर जखमी झाल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, शुभमचा वाटेतच मृत्यू झाला. रविवारी दुपारच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. वैनगंगा नदी काठावरील स्मशानभूमीकडे गावकरी जात होते. सालई शिवारात येताच मधमाशांनी अंत्ययात्रेत सहभागींवर हल्ला केला. साऱ्यांची पळापळ सुरू झाली. जवळच असलेल्या उसाच्या शेतात जाऊन काही दडले. काही धानाच्या शेतातील चिखलात तर काहींनी दुचाकीने गावाच्या दिशेने धाव घेतली. तिरडी घेऊन असलेल्या पाच-सहा जणांचीही अडचण झाली. काय करावे हे सूचत नसल्याने त्यांनी तिरडी खाली ठेवून जवळच असलेल्या वैनगंगेच्या पात्रात उडी घेऊन जीव वाचविला.