नागपूर : यंदाचा इंडियन प्रिमियर लीगचा (आयपीएल) हंगाम संपलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने रविवारी हैदराबाद संघाचा पराभव करत दहा वर्षानंतर आयपीएलचा खिताब जिंकला. दरवर्षी प्रमाणे यंदाचा आयपीएलचा १७ वा हंगाम देखील चुरसपूर्ण होता. यामध्ये विविध संघाकडून विदर्भातील सहा खेळाडुंनी सहभाग घेतला. यामध्ये पंजाब किंग्स इलेवन संघाकडून जितेश शर्मा आणि लखनऊ जायंट्स संघाकडून यश ठाकूर यांची कामगिरी वगळली तर विदर्भाच्या इतर खेळाडुंनी समाधानकारक कामगिरी केली नाही.

पंजाब संघाच्या व्यवस्थापनाने विदर्भाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज जितेश शर्मा याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. आयपीएलच्या इतिहासात कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा जितेश पहिला खेळाडू आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्यांदा पाच विकेट घेण्याचा मान विदर्भाचा गोलंदाज यश ठाकूर याने मिळविला. एकंदरीत आयपीएल स्पर्धेत विदर्भाच्या खेळाडुंचा सहभाग वाढत आहे. आयपीएलमधील विविध फ्रेंचायजी विदर्भातील खेळाडुंवर विश्वास देखील दाखवत आहे, मात्र काही अपवाद वगळता विदर्भातील खेळाडू यंदाच्या हंगामात समाधानकारक कामगिरी दाखवू शकले नाही.

हेही वाचा : नागपूर विभागाच्या दहावीच्या निकालात वाढ, मात्र क्रमवारीत घसरण; गोंदिया जिल्हा अव्वल

जितेश शर्मा

जितेश शर्मासाठी यंदाचा हंगाम फार विशेष राहिला आहे. पंजाब संघाकडून जितेश शर्माने हंगामातील १४ सामने खेळले. यात १३१ च्या स्ट्राईक रेटसह जितेशने एकूण १८७ धावा काढल्या. यष्टीरक्षक म्हणून जितेशने १३ कॅच देखील पकडल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, जितेशला हैदराबाद विरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली होती. जितेश हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील आहे. त्याने भारताकडून ९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यामध्ये १०० धावा काढल्या आहेत.

यश ठाकूर

यश ठाकूर हा लखनऊ जायंट्सचा तरुण गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामात त्याने दहा सामने खेळले आणि ११ फलंदाजांना बाद केले. गुजरात टायटन्स विरुद्धचा सामन्यात ३० धावा देत त्याने ५ गडी बाद केले होते. यंदाच्या हंगामातील हा पहिला पाच विकेटचा हॉल्ट होता.

शुभम दुबे

डावखुरा फलंदाज राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. आयपीएल लीलावात ५.८० कोटी रुपये प्राप्त झाल्याने शुभम दुबे चर्चेत आला होता. मात्र यंदा तो समाधानकारक प्रदर्शन करू शकला नाही. चार सामन्यात शुभमने केवळ ३३ धावा काढल्या. यामध्ये दिल्ली संघाविरुद्ध काढलेल्या सर्वाधिक २५ धावांचाही समावेश आहे.

हेही वाचा : धक्कादायक : पानपट्टीचालकाची कुकरीने वार करून हत्या, बुलढाण्याच्या खामगावमधील थरार

उमेश यादव

विदर्भाचा स्टार खेळाडू उमेश यादवसाठीही यंदाचा हंगाम काही विशेष राहिला नाही. गुजरात टायटन्सकडून गोलंदाजी करत उमेशने सात सामन्यात आठ गडी बाद केले. २०१० पासून उमेश आयपीएलमध्ये खेळत आहे. २०२३ मध्ये उमेशने आपल्या नावानुसार कामगिरी दाखविली नव्हती. उमेशने आतापर्यंत आयपीएलचे १४८ सामने खेळले. विदर्भातील कुठल्याही खेळाडूची ही सर्वाधिक संख्या आहे.

अथर्व तायडे

डावखुरा फलंदाज अथर्व तायडेला यंदाच्या हंगामात पंजाब संघाकडून केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने एकूण ६१ धावा काढल्या. मागील हंगामात अथर्वने सात सामन्यात १८६ धावा काढल्या होत्या.

हेही वाचा : सुवर्णवार्ता : सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…

दर्शन नलकांडे

दर्शन नलकांडे हा गुजरात टायटन्स संघाकडून आयपीएलमध्ये सहभागी झाला. विदर्भाचा तरुण गोलंदाज म्हणून प्रसिद्ध दर्शनने तीन सामन्यात तीन गडी बाद केले. दर्शनने २०२२ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यापूर्वीच्या दोन्ही हंगामात देखील त्याला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही.