बुलढाणा: क्षुल्लक कारणावरून चौघा इसमांनी पानपट्टीचालकाची हत्या केल्याची घटना खामगाव बस स्थानकासमोर घडली. वादळी वाऱ्यामुळे शहराचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फायदा घेत चौघे आरोपी फरार झाले.

रविवारी (दि. २६) रात्री दहा वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. यामुळे खामगाव शहर हादरले असून आज याप्रकरणी चौघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री खामगाव शहर व परिसराला वादळाने तडाखा दिला. विजांचा कडकडाट व पाऊसही सुरू असल्याने संपूर्ण खामगाव शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यादरम्यान, खामगाव शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या जय माँ पानमंदिर येथे चौघेजण आले. यावेळी पानपट्टीचे मालक प्रकाश सोनी हे बाहेरील बाकड्यावर बसले होते. त्यांचा मुलगा गोपाल सोनी (२७, रेखा प्लॉट, खामगाव) पानपट्टीत काम करीत होता. या चौघांनी क्षुल्लक कारणावरून प्रकाश सोनी यांच्याशी वाद घातला. पंधरा दिवसापूर्वी इथे आलेल्या आमच्या माणसाला तू धक्का का मारला, असा जाब त्यांनी विचारला.

हेही वाचा : सुवर्णवार्ता : सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…

यावरच न थांबता विठ्ठल बढे याने मागून प्रकाश सोनी याना धरले तर दोन अनोळखी आरोपींनी त्यांचे हात धरले.यावेळी आरोपी विजय बढे याने कुकरीने प्रकाश सोनी यांच्यावर सपासप वार केले. यामुळे ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले.

हेही वाचा : अग्निसुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा कमकुवत! नागपुरातील २१९ उद्योगांमध्ये…

दरम्यान यानंतर दोन आरोपी खामगाव बसस्थानक तर दोघे शेगाव मार्गाकडे पळाले. गोपाल सोनी व त्याच्या मित्रांनी गंभीर जखमी प्रकाश सोनी ( राहणार रेखा प्लॉट, हिंदुस्थान बेकरी, तलाव मार्ग, खामगाव) याना खामगाव उप जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी चार आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. यामध्ये मुख्य आरोपी विजय बढे, एकनाथ बढे ( दोन्ही राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा) यांच्यासह दोन अनोळखी आरोपींचा समावेश आहे.