गडचिरोली : राज्यात दररोज लैंगिक छाळाच्या गुन्ह्यांनी खळबळ उडत असताना गडचिरोलीत आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भामरागड तालुक्यातील एका आदिवासीबहुल गावातील शाळेत मुख्यधापकाने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. रवींद्र उष्टुजी गव्हारे (४६) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला लाहेरी पोलिसांनी अटक केली आहे.

भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा या आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेत मुख्याध्यापक असलेला आरोपी रवींद्र गव्हारे याने चार विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तपासात पीडित विद्यार्थिनींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका महिला पालकाच्या तक्रारीवरुन लाहेरी उप पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द ५ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदार महिलेच्या ९ वर्षीय मुलीसह नात्यातील ११ वर्षीय मुलगी व अन्य दोन मुलींना रजिस्टर आणून देण्याच्या बहाण्याने आपल्या दालनात एकेकटी बोलावून गेल्या आठ दिवसांपासून तो त्यांच्याशी अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कारवाईचे आदेश दिल्यावर उपनिरीक्षक सचिन सरकटे यांनी गुन्हा नोंदवून घेत मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याच्या मुसक्या आवळल्या.

निलंबनाचा प्रस्ताव

दरम्यान, जि.प. सीईओ सुहास गाडे यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर शिक्षणाधिकारी (प्रा.) बाबासाहेब पवार यांना तातडीने मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याच्याविरुध्द कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव बनविण्याची लगबग ६ मार्चला जिल्हा परिषदेत सुरु होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अतिदुर्गम, दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. आता कुक्कामेटा गावातील घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी एटापल्ली येथे तालुकास्तरीय संमेलनादरम्यान भररस्त्यात काही शिक्षक मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, पण त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. प्रशासन गैरवर्तन करणाऱ्यांना अद्दल घडवून जरब कधी बसविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.