नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. काँग्रेस नेते आणि विधानसभा निवडणुकीत फडणवीसांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा दावा करत फडणवीस यांची निवड रद्द करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने याला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट करत गुडधे पाटील यांची याचिका फेटाळली होती. मात्र, यानंतर आता प्रफुल्ल गुडधे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, फडणवीस यांनी निवडणूक याचिकेवर विविध टप्प्यातच आक्षेप घेऊन ही याचिका सुरुवातीच्या फेटाळून लावण्याची विनंती केली होती. निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील विविध निकष पूर्ण करीत नाही, असा दावा त्यांनी केला होता. उच्च न्यायालयाने गेल्या ४ जुलै रोजी फडणवीस यांचा आक्षेप अर्ज मंजूर करून गुडधे यांची निवडणूक याचिका फेटाळून लावली. गुडधे यांनी त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुडधे यांच्यातर्फे ॲड. किशोर लांबट व ॲड. पवन डहाट यांनी कामकाज पाहिले.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल गुडधे पाटील आमनेसामने होते. या निवडणुकीत फडणवीस यांनी सुमारे ४० हजार मतांच्या आघाडीने विजय मिळवला. परंतु, पराभव स्वीकारण्यास गुडधे पाटील यांनी नकार देत निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा दावा केला होता. त्यांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत फडणवीस यांची आमदारकी रद्द ठरवण्याची मागणी करत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्याला गुडधे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.