* दरवाढीवरून भाजपची पंचाईत  * समाजमाध्यमावर टीकेची झोड * काँग्रेस, राष्ट्रवादी गप्प बसल्यानेही संताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोलच्या किमतीचा भडका उडाल्याने सर्व सामान्यांच्या खिशावर ताण वाढला आहे. २०१३ नंतर प्रथमच पेट्रोलचे दर ८० रुपयांवर गेले आहे. काँग्रेस राजवटीत पेट्रोल दरवाढीवर आंदोलन करणारे भाजप नेते आता त्यांच्या सत्ताकाळात किमतीने उच्चांक गाठल्यावरही गप्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. समाजमाध्यमांवर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत असून विरोधी पक्षात असताना नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षही या मुद्यावर गप्प असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पेट्रोलच्या किमतीने नागपुरात सोमवारी उच्चांक गाठला. साध्या पेट्रोलचे दर ८० रुपये ५ पैसे झाले तर प्रिमियम पेट्रोलचे दर ८२ रुपये ८५ पैसे झाले आहेत. विदर्भ पेट्रोलियम डिलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१३ मध्ये नागपुरात प्रतिलिटर ८० रुपयांपर्यंत दर गेले होते. जकात रद्द करून स्थानिक स्वराज्य संस्था कर आकारण्यात येऊ लागला होता. त्यामुळे ही वाढ झाली होती. त्यानंतर प्रथमच दर ८० रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले.

तीन वर्षांपूर्वी विरोधी पक्षात असताना भाजप नेत्यांनी पेट्रोल दरवाढीवर रान उठवले होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वस्तरावरील नेत्यांनी मोर्चे, निदर्शने करून जनतेच्या रोषाला वाट मोकळी करून दिली होती. भाजपचे नेते बैलगाडीवर स्कूटर ठेवून मोर्चे काढत होते. सत्तेत आल्यानंतर तीन वर्षांत नागपुरात पेट्रोल दरवाढीचा विक्रम केला तर स्वयंपाक गॅस सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम कमी केली आहे. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. भाजप नेत्यांनी ते विरोधी पक्षात असताना दरवाढीबाबत केलेल्या वक्तव्याची त्यांना आठवण करून दिली जात आहे. त्या संदर्भातील संदेश, व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत.

यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस किंवा इतर पक्षांनी याबाबत सरकारला धारेवर धरण्याचे तर सोडाच, पण साधा विरोध करणेही टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरे तर या मुद्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांना सरकार विरोधात जनमत ढवळून काढायला ही संधी आहे. मात्र, कायम सत्तेत राहिल्यामुळे नेते घराबाहेरही पडायला तयार नाही. सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका बजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेने या मुद्यांवर मौन धारण केले आहे, तर सत्ताधारी भाजपने विकास-विकास असे ढोल अधिक जोरात वाजवून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर चर्चा होणार नाही. याची सोईस्कर काळजी घेतली आहे.

‘‘कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे पेट्रोलचे भाव वाढले आहे. यासंदर्भात केंद्र सरकार अभ्यास करीत आहे, लवकरच भाव कमी होण्याची शक्यता आहे.’’

– सुधाकर कोहळे,

आमदार व अध्यक्ष शहर भाजप.

‘‘मुंबईत यूथ काँग्रेसने आणि नागपुरात एनएसयूआयने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. काँग्रेस कायम जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करते. दरवाढीच्या मुद्यांवर आंदोलन केले जाईल.’’

– नितीन राऊत, उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol cost in nagpur more than rs
First published on: 19-09-2017 at 01:55 IST