मुंबई पोलिसांकडे तसेच सायबर पोलिसांकडे दाखल असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात शासनाने परवानगी नाकारल्याने शुक्ला यांना दिलासा मिळाला होता. पण पुणे पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत मात्र न्यायालयानेच पुन:तपासाचे आदेश दिल्याने शुक्ला यांची तूर्तास पंचाईत झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.

एकनाथ खडसे म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहतोय की रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने चौकशी केली, त्याचा अहवाल न्यायालयात सादर केलेला होता. न्यायालयाने तो अहवाल फेटाळला आणि याची परत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं मी वर्तमानपत्रातही वाचलं. मला याबाबत माहिती हवी आहे की, रश्मी शुक्लांनी ज्यावेळस यामध्ये फोन टॅप केले. माझाही फोन ६८ दिवस टॅप केला आणि त्यामध्ये आता सरकार परत चौकशी करणार आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की, एकतर माझ्यासारख्याचा फोन टॅप करणे, म्हणजे काहीतरी हेतू त्यामागे असेल. त्या कालखंडातील जो कोणी त्यांना आदेश देणारा असेल, त्याचा हेतू काही शुद्ध असेल असं नाही. परवानगीविना फोन टॅप करणं म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासारखं आहे. मला तो घटनात्मक अधिकार आहे की माझ्या परवानगीशिवाय असं करता येऊ नये. परवानगीशिवाय ६८ दिवस माझा फोन टॅप केला गेला. आता माझी परवानगी अशी आहे की, त्या कालखंडामध्येही याची मला पूर्णपणे कल्पना न देता किंवा माझ्याशी चर्चा न करता माझा जबाब न घेता, याप्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. एक दिवस बोलावलं एक मिनिटाचा जबाब घेतला, सोडून दिलं.”

हेही वाचा – न्यायालयाच्या आदेशामुळे शुक्ला यांची पंचाईत?

याचबरोबर “माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्यांचे फोन टॅप केले गेले मग संजय राऊतांचा केला, माझा केला, नाना पटोलेंचा केला. तर यांना समक्ष बोलावून त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा तरी जबाब घेतला पाहिजे. हे प्रकरण गंभीर आहे. आता मला भीती वाटते, कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं. फोन अशा पद्धतीने टॅप होत असतील तर हे बरोबर नाही.” असंही खडसे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “आता जर प्रथमदर्शनी असं दिसलं असेल, तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की त्यांना आणखी उच्च पदावर नेणार आहात? यामागे कोण आहे, कोणाला फायदा होणार होता? काय संभाषण झालं. माझं आणि ते संभाषण प्रकाशित करणार आहात का? माझं काही खासगी संभाषण असेल, तर त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो. या अनेक प्रश्नांची उत्तर मला मिळाली पाहिजे. हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे, मी या सभागृहाचा एक सदस्य आहे आणि माझाच जर फोन टॅप होत असेल, तर मुख्यमंत्री महोदय मला या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. न्यायालयाची चौकशी होईल तेव्हा होईल. प्रथमदर्शनी तथ्य असेल, तर त्या अधिकाऱ्यांविरोधात आपण तातडीने काय कारवाई करणार? हे फार गंभीर आहे. नियमानुसार नाही, घटनाबाह्य आहे म्हणून तातडीने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा.”अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी यावेळी केली.