चंद्रपूर : म्हाडाची कुठलीही परवानगी न घेता म्हाडा कॉलनीतील प्रस्तावित नवीन चंद्रपूर व सिकलसेल हॉस्पिटल परिसरात वीज केंद्रातील फ्लाय ॲश मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्याने तसेच निवासी जागेवर एमईएलमधून निघणाऱ्या कच्च्या लोह दगडाचे क्रशर विनापरवानगी लावल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तर फ्लाय ॲशमुळे कोट्यवधींचे रस्ते खराब झाले आहेत. परिणामी, लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरालगत कोसारा परिसरात म्हाडाने नवीन कॉलनीत विकसित केली आहे. तसेच येथे नवीन चंद्रपूर प्रस्तावित असून केंद्र सरकाने सुरू केलेले सिकलसेल हॉस्पिटल आहे. गावापासून दूर प्रदूषणमुक्त असलेल्या या परिसरात मागील काही महिन्यापासून डीएनआर या ट्रान्सपोर्ट कंपनीने कॅप्सूल ट्रकमधून वीज केंद्रातील फ्लाय ॲश टाकण्यास सुरुवात केली आहे. या परिसरातील सर्व रस्त्यांवर ही राख मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहे. तसेच मोकळ्या प्लॉटवर देखील ॲश पसरवण्यात आली आहे. कुठलीही परवानगी न घेता डीएनआर ट्रान्सपोर्ट कंपनीकडून हा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे, हवा आल्यानंतर किंवा एखादी जड वाहन या रस्त्यांवरून गेले तर ही राख उडेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचा त्रास सिकलसेल हॉस्पिटलमधील रुग्णांना तसेच डॉक्टर व निवासी लोकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रारी केल्यानंतरही कारवाई होण्याऐवजी आता हा प्रकार इतका वाढला आहे की सर्वच रस्त्यांवर फ्लाय ॲशचे ढीग लागले आहेत. तसेच म्हाडा कॉलनीतील निवासी जमिनीवर शहरातील गोयल नामक उद्योजकाने म्हाडाची परवानगी न घेता येथे क्रशर प्लान्ट सुरू केला आहे.

हेही वाचा >>> भंडारा: आईवडील दगावले, दोन वर्षाचा चिमुकला बचावला…शिवशाही अपघातात जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू

येथील सेलच्या एमईएल कंपनीतून निघणारा लोहमिश्रीत दगड या क्रेशरमध्ये बारीक केला जातो. त्यानंतर इथून तो ट्रकमध्ये भरून इतरत्र पाठवण्यात येतो. फ्लाय ॲश व क्रेशरमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. म्हाडाची कुठलीही परवानगी न घेता हा सर्व प्रकार सुरू आहे. फ्लाय ॲश ही आरोग्यासाठी अतिशय हानीकारक आहे. तेव्हा अशी रस्त्यावर फ्लाय ॲश टाकणे गुन्हा असताना सर्रास हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भात चंद्रपूर म्हाडाचे प्रमुख विष्णू बेलसरे यांना विचारणा केली असता परवानगी न घेताच वीज केंद्राची फ्लाय ॲश म्हाडा कॉलनीतील रस्त्यालगत टाकण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती दिली.

हेही वाचा >>> वर्धा : कराळे मास्तरांचे नशीबच खराब, आता ॲट्रासिटीचा गुन्हा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीएनआर ट्रान्सपोर्ट कंपनीकडून हे कृत्य सातत्याने होत आहे. यापूर्वी सिकलसेल हॉस्पिटल परिसरात ॲश टाकण्यात आली होती. तेव्हा संबंधितांना ठणकावण्यात आले होते. तसेच सिकलसेल हॉस्पिटल परिसर स्वच्छ केला होता. मात्र, आता पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दोन दिवसात नोटीस देणार असल्याची माहिती दिली. निवासी प्रयोजनार्थ आरक्षित जमिनीवर गोयल नावाच्या व्यक्तीने क्रेशर सुरू केले हा देखील गुन्हा आहे. त्यालाही नोटीस देणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या म्हाडा कॉलनीत मोठ्या प्रमाणात लोखंडी दगडाची बारीक भुकटी अनेक मोकळ्या जमिनीवर पडून आहे. त्याबाबत विचारले असता बेलसरे काहीही बोलले नाहीत.