नागपूर : सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली, तरी सर्वत्र प्लास्टिकचे साहित्य दिसते. प्लास्टिक दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. आपण प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पितो, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न देतात. जमीन, पाणी, हवा आणि अन्नात प्लास्टिक प्रदूषण वाढत आहे. या प्लास्टिकचा मेंदूवर परिणामाबाबत जगभरातील मेंदूरोग तज्ज्ञांनी भाष्य केले आहे.

जागतिक मेंदू सप्ताहनिमित्त वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, जमीन , पाणी, हवा आणि अन्नात प्लास्टिक प्रदूषण वाढतच आहे. त्याचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. डॉ. निहार्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक्स जमा होतात आणि डिमेंशिया असलेल्यांमध्ये त्यांची पातळी १० पट जास्त असते. हे मायक्रोप्लास्टिक १ नॅनोमीटर ते ५ मिमी आकाराचे असते. त्याला नॅनोप्लास्टिक्सही म्हणतात. हे प्लास्टिक शरीरात पोटाद्वारे, श्वासाद्वारे किंवा
त्वचेद्वारे प्रवेश करून रक्ताभिसरणात प्रवेश करतात. त्यनंतर यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूसारख्या विविध अवयवांमध्ये जमा होतात. ट्युनिशियातील वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे माजी विश्वस्त डॉ रियाद गुदेर म्हणाले, मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण यकृत आणि मूत्रपिंडांपेक्षा २०-३० पट जास्त असते. दरवर्षी आपण सुमारे २५० ग्रॅम प्लास्टिक खातो. २०१६ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या सामान्य लोकांच्या मेंदूची २०२४ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांशी तुलना केली असता, २०२४ च्या मेंदूमध्ये सुमारे ५० टक्के जास्त मायक्रोप्लास्टिक्स असल्याचे आढळून आले.

मेंदूमध्ये अंदाजे ७ ग्रॅम सूक्ष्म आणि नॅनो प्लास्टिक…

मेंदूतून आढळलेल्या १२ प्रकारच्या प्लास्टिक पॉलिमरपैकी, पॉलीइथिलीन जास्त प्रमाणात दिसते. ते बाटल्या, कप, पॅकेजिंग आणि कंटेनरसाठी वापरले जाते. मेंदूच्या वजनाच्या ०.५ टक्के प्लास्टिक असते. आयुष्यभर आपल्या मेंदूमध्ये अंदाजे ७ ग्रॅम सूक्ष्म आणि नॅनो प्लास्टिक जमा होतात. हे पॅरिकल्स लहान रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये दाहक प्रतिक्रिया देखील होऊ शकते आणि स्ट्रोकही येऊ शको.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळे, भाज्याही मायक्रोप्लास्टिक्सपासून…

आपल्या आहारात फळे आणि भाज्या असाव्यात, परंतु त्या मायक्रोप्लास्टिक्सच्या दोषा पासून सुरक्षित नाहीत. फळे आणि भाज्या त्यांच्या मुळांद्वारे मायक्रोप्लास्टिक्स शोषून घेतात आणि मायक्रोप्लास्टिक्सच्या आकारानुसार ते बिया, पाने आणि फळांमध्ये प्रवेश करतात. सफरचंद आणि गाजर यात प्रति ग्रॅम १ लाखाहून जास्त मायक्रोप्लास्टिक्स चे प्रमाण दिसते. समुद्रात २४ ट्रिलियन मायक्रोप्लास्टिक्सचे तुकडे आहेत, त्यामुळे समुद्री प्राणी अनेकदा प्लास्टिक खातात हे आश्चर्यकारक नाही. मासे खाताना, तुम्ही त्यांनी खाल्लेले सर्व प्लास्टिक देखील खाता. चहाच्या पिशव्या सामान्यतः प्लास्टिकच्या बनलेल्या असतात, म्हणून जेव्हा त्या गरम पाण्यात ठेवल्या जातात तेव्हा प्लास्टिक पेयात वितळते आणि चहाच्या प्रत्येक घोटात आपण हजारो मायक्रोप्लास्टिक्स ग्रहण करतो. जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीतून एक लिटर पाणी पितो तेव्हा २ लाख ४० हजार प्लास्टिक कण आपल्या पोटात जातात. प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम केल्याने त्या अन्नात अब्जावधी प्लास्टिकचे कण सोडले जातात, असेही अमेरिकेतील डब्लू. एफ. एन.च्या पर्यावरणीय न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुपचे अध्यक्ष प्रो. पीटर स्पेन्सर म्हणाले. टूथपेस्टमध्येही मायक्रोप्लास्टिक्स असतात. त्वचाही प्लास्टिकच्या प्रवेशाचा आणखी एक स्रोत असल्याचेही त्यांनी सांगितले.