नागपूर : न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना बुधवारी शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त झाले. भूषण गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. २००७ साली सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्या. के.जी. बालाकृष्णन यांच्यानंतर न्या. गवई हे दुसरे दलित व्यक्ती ठरणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

सुमारे दहा मिनिटे हा शपथविधी सोहळा चालला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना, केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाश सिंह, विधी मंत्री अर्जुन राम मेघवाल, उद्योग मंत्री पीयुष गोयल, रसायन विभागाचे मंत्री जेपी नड्डा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शपथविधी सोहळा संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कृती सध्या चर्चेचे कारण ठरत आहे.

काय केले मोदींनी?

न्या. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. त्यांना दादासाहेब म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अमरावतीचे खासदारपद व पुढे बिहार, सिक्किम आणि केरळचे राज्यपालपद भूषवले. गवई राजकीय कुटुंबातून आले असले तरी न्याय क्षेत्रात त्यांनी कधीही याचा परिणाम होऊ दिला नाही. न्या. गवई यांना सरन्यायाधीश म्हणून अगदी सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

सरन्यायाधीशपदाची शपथ घेताच १५ मे रोजी त्यांच्यासमोर वक्फ कायद्याचे प्रकरण सुनावणीसाठी येईल. न्यायपालिकेवर विश्वास कमी करणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गवईंकडे सरन्यायाधीशपद आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्या.गवई यांचा शपथविधी सोहळा महत्वपूर्ण आहे. शपथविधी सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. यानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि त्यांच्या पाठोपाठ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रस्थान करायला सुरूवात केली. राष्ट्रपती बाहेर प्रस्थान करत असतानाच मोदी थेट गवई यांच्या कुटुंबीयांकडे वळले.

न्या.गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांच्याकडे मोदी गेले आणि त्यांचा हात पकडून त्यांना अभिवादन केले आणि आपुलकीने संवाद साधला. मोदी यांनी कमलाताई गवई यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. दरम्यान, न्या.गवई यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी समोर येऊन मोदी यांच्यासोबत हस्तांदोलन केले. उल्लेखनीय आहे की अलिकडेच नागपूर दौऱ्यादरम्यान आलेल्या मोदींनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यावेळी देखील मोदी यांनी कमलाताई गवई यांच्या प्रकृतीबाबत राजेंद्र गवई यांना विचारणा केली होती.