नागपूर : चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या ४ आरोपींनी चाकूच्या धाकावर एका प्रॉपर्टी डीलरच्या घरी दरोडा टाकला. त्यांचे कापडाने हातपाय बांधल्यानंतर कपाटातील दागिने लुटले आणि फरार झाले.
ही खळबळजनक घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. वाठोडा पोलिसांसह गुन्हे शाखेनेही घटनेचा तपास सुरू केला आणि चार तासांच्या आत ४ आरोपींना शोधून काढत बेड्या ठोकल्या. नौशाद उर्फ चिकन मुस्तफा खान (२१) रा. झोन चौक, हिंगणा रोड, मोहम्मद इरशाद रईस अंसारी (३०) रा. राजीवनगर, हिंगणा रोड, नासिर शौकत शेख (२४) आणि नीतेश रामलोचन यादव (१९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. घटनेचे मुख्य सूत्रधार गणेश रामा गांडेकर (२७) रा. राजीवनगर आणि हनुमान मधुकर धोत्रे (२५) रा. गंगानगर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>> भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा १४ ला अकोल्यात; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी
पोलिसांनी जितेंद्र विठ्ठल चिकटे (४६) रा. अनमोलनगर, वाठोडाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. जितेंद्र हे प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळी जितेंद्रची पत्नी दोन मुलांसह माहेरी गेली होती. जितेंद्र घरी एकटेच होते. रात्रीला जेवणानंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले. रात्री २.३० वाजताच्या सुमारास आरोपींनी मागचा दरवाजा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. आवाजाने जितेंद्रची झोप उघडली असता समोर ४ जण उभे होते. गळ्याला चाकू लावून आरोपींनी कापडाने जितेंद्रचे हात बांधले. आरडा-ओरड होऊ नये म्हणून तोंडात कापडाचा गोळाही कोंबला आणि दागिने व पैशांबाबत विचारपूस सुरू केली.
उत्तर मिळत नसल्याने आरोपींनी चाकूच्या मुठीने त्यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. बेडरुमच्या कपाटातील सर्व सामान बाहेर फेकले. सर्व कपाट शोधल्यानंतर आरोपींच्या हाती केवळ १ मंगळसूत्र आणि चांदीची वाटी लागली. हॉलमध्ये ठेवलेल्या चावीने दार उघडत आरोपी फरार झाले. कसेबसे जितेंद्रने आपले हात मोकळे करून शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळावर पोहोचले. घटनेमागे काही ऑटोचालक असून ते राजीवनगर परिसरात राहात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाला माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने वरील चारही आरोपींना अटक केली.