खुद्द पोलीस आयुक्तांची कबुली
महिलांच्या मंगळसूत्रांशी धार्मिक भावना जुळलेली असते. याशिवाय ‘चेन स्नॅचिंग’मध्ये मंगळसूत्र गमावल्यानंतर महिलांना मानसिक धक्का बसतो. या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून आरोपींना शोधून अशा घटना रोखण्यात पोलिसांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नसल्याने ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची कबुली पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी मंगळवारी दिली.
मंगळवारी पोलीस जिमखाना येथे गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस आयुक्तांसह नवनियुक्त पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुहास वारके, शहरातील सर्व पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. हिंदू धर्मात मंगळसूत्र हे महिलांसाठी पवित्र आहे. रस्त्यावरून जाताना एखाद्या महिलेचा मंगळसूत्र हिसकावने हा संबंधित महिलेसाठी मानसिक धक्का असतो. याशिवाय इतर महिलांच्या गळयातील दागिने पळविणे हा गंभीर गुन्हा आहे. अनेकदा घटनांमध्ये महिलांना कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. अशा सोनसाखळी चोरांवर अंकुश लावण्याचे विविध उपाय करण्यात येत आहेत. परंतु अपेक्षेनुसार यश मिळत नसल्याचे ते म्हणाले. आता अधिकचे नवीन अधिकारी मिळाले असून पुन्हा सोनसाखळी चोरांविरुद्ध मोहीम राबवून घटनांवर नियंत्रण आणण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त यावेळी म्हणाले. शहरातील गुन्हेगारांचा पूर्वेतिहास तपासून ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येते. यात कोणावरही सूड भावनेतून कारवाई होत नाही. मात्र, समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागते. पोलिसांच्या कारवाई तपासण्याचे उच्च न्यायालयाला पूर्ण अधिकार आहेत. मात्र, नागपूर पोलिसांनी मोक्कांतर्गत केलेली कारवाई योग्य असून अधिकाधिक गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे, असेही पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

‘डब्बा’त पोलिसांचे घूमजाव
समांतर शेअर बाजार म्हणून प्रसिद्ध ‘डब्बा व्यापारा’त अनेक राजकीय पुढाऱ्यांचे हात असण्याची शक्यता दोन महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र, मंगळवारी पोलीस आयुक्तांनी राजकीय पुढाऱ्यांच्या समावेशाबद्दल नकार दिला. डब्बा प्रकरणातील अनेक आरोपी मोकाट असून त्यांच्या अटकेसंदर्भातील प्रष्टद्धr(२२४)्नाांवर थातुरमातूर उत्तरे दिली. तसेच या प्रकरणाचा तपास आता पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्या मार्गदर्शनात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस आयुक्तांच्या उत्तरानंतर डब्बा व्यापारातील आरोपींना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेच अभय असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली.