बुलढाणा : वाढत्या गुन्हेगारीमुळे कायम चर्चेत असलेल्या पुणे शहरातील कोयता गँगचे बुलढाणा जिल्ह्यातील ‘काही’ युवकांना भलतेच आकर्षण आहे. त्यातच दक्षिणात्य चित्रपटांनी कोयत्याची ‘क्रेज’ जास्तच वाढविली आहे.

यामुळे वाढदिवसाच्या ‘शुभ मुहूर्तावर’ बुलढाण्यातील तरुण कोयता हाती घेऊन सुसाट दुचाकी वाहनावर मिरवितानाची रिल सोशल मीडियावर टाकतात. कथित भाईगिरी अन दबंगगिरीचे व्हिडिओ बनवून इन्स्टाग्राम, फेसबुक सह इतर समाज माध्यमावर व्हायरल करून (नसलेली) दहशत निर्माण करण्याची (उगाचच) धडपड करतात.

जिल्हा व पोलीस दलाचेही मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातील दोघा युवकांनी असाच उपदव्याप करून कोयता कारनामा केला. मात्र, ही नसती उठाठेव त्यांना भलतीच महागात पडली. याचे कारण म्हणजे अश्या कारणाम्यावर बारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्या बुलढाणा शहर पोलिसांनी दोघा ‘भाईं’वर भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हे तर दाखल केलेच पण त्यांना त्यांच्याच पद्धतीने अद्दल घडविली.

बुलढाणा येथील अमित बेंडवाल आणि आदित्य ऊर्फ शक्ती संजय देशमुख दोघे यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केला होता. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी दोघांविरुध्द आर्म ऍक्ट अन्वय गुन्हा दाखल करत त्यांना गजाआड केले. तसेच त्यांची भाईगिरी थांबावी म्हणून पोलिसांनी त्यांची दयावाया करून माफी मागतांनाची रिल तयार केली आहे. ज्यात दोन्ही तरुण माफी मागत असून आम्ही घोडचूक केली तशी तुम्ही करू नका असे विनम्र आवाहन करीत आहे. असे व्हिडिओ इतर तरुणांनी काढू नये असे आवाहनही ते इतरांना करत आहे.

बुलढाणा शहर पोलिसांनी देखील तरुणांनी भाईगिरीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू नये अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दोघा तरुणांना धडा शिकवितानाच इतर तरुणांना सावध केले आहे.