लोकसत्ता टीम

नागपूर : वाडी पोलीस ठाण्यातील एका बीट मार्शलने एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात आणून चांगला चोप दिला. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला तर जखमी पोलीस निरीक्षकाने मेयो रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन वैद्यकीय चाचणी करण्यास नकार देत शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे त्या पोलीस निरीक्षकावरही गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज मडावी असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे तर राजेश कुमार असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून पोलीस वर्तुळात या प्रकरणाची खमंग चर्चा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक राजेश हे नक्षल विरोधी अभियान (गडचिरोली) येथे कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ते एका हॉटेलमध्ये भोजन करायला गेले होते. त्यावेळी दोन ग्राहकांत किरकोळ वाद झाला. त्या पोलीस निरीक्षकाने मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटविला. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच वाडी ठाण्याचे बीट मार्शल पंकज मडावी आणि अन्य एक कर्मचारी हॉटेलमध्ये आले. त्यांनी याप्रकरणाविषयी ग्राहकांना विचारपूस केली. तसेच पोलीस निरीक्षकांना विचारले. त्यांनी किरकोळ वाद झाल्याचे सांगून ‘पोलीस नेहमी उशिरा पोहचतात, म्हणून पोलिसांचे नाव खराब होते’ असे सुनावले. त्यामुळे चिडलेल्या पोलीस कर्मचारी पंकजने हॉटेलमध्येच चांगला चोप दिला. राजेश यांनी खेचून पोलीस ठाण्यात घेवून गेले. त्यांना तेथेही चांगली मारहाण केली. पोलीस निरीक्षकाला रात्री मेयो रूग्णालयात उपचारसाठी नेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, त्यांनी सहकार्य केले नाही. डॉक्टरांना उपचारही करू दिला नाही. बीट मार्शलला शिवीगाळ केली. त्यांना पोलीस वाहनात बसवित असताना त्यांनी बसण्यास नकार दिला. राजेश यांनी वाडी पोलीस ठाण्यात बीट मार्शल पंकज मडाविविरूध्द तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पंकजविरुद्ध २९६, ११५ (२) अशी गुन्ह्याची नोंद केली. बीट मार्शलने झालेला संपूर्ण प्रकार वरिष्ठांना सांगितला. लगेच ते तहसील पोलीस ठाण्यात गेले. सरकारी कामात अडथळा केल्याचा आरोप करीत पोलीस निरीक्षक राजेश यांच्याविरूध्द तक्रार केली. तक्रारीवरून पोलीस निरीक्षकावरही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे पोलीस विभागाची बदनामी झाली. या प्रकरणी पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.