शाळा व्यवस्थापनाविरुद्ध अद्याप गुन्हा नाही;  पोलिसांची भूमिका संशयास्पद

पाच आदिवासी विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस येऊन सहा दिवस उलटले तरी तुली पब्किल स्कूल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येऊ नये म्हणून पोलिसांवर कुणाकडून दबाव येत आहे का? शाळा व्यवस्थापनाला कोणी पाठीशी घालत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

यवतमाळ पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींशी झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसांनी संबंधित शिक्षकांसह संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापकांना आरोपी केले. त्यांना अटक केली आणि तुरुंगात डांबले. त्यानंतर खामगाव येथील आश्रमशाळेतील मुलींवरही अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. त्या प्रकरणातही पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त आणि मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हे दाखल करून संबंधितांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर जिल्ह्य़ातील बुटीबोरी येथील होलीक्रॉस आश्रमशाळेत एका दहा वर्षीय विद्यार्थ्यांशी चौकीदारानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वीच उघडकीस आली. त्यावेळीही ग्रामीण पोलिसांनी चौकीदारासह संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी कोराडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बोखारा येथील तुली पब्लिक स्कूलमध्ये पाचव्या आणि सहाव्या वर्गात शिकणाऱ्या पाच आदिवासी विद्यार्थिनींचा आचाऱ्याने विनयभंग केला. हा प्रकार आदिवासी प्रकल्प विकास अधिकाऱ्यांच्या निरीक्षण भेटीत उघडकीस आला. या प्रकरणात कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला.

पोलिसांनी जमीर बापत्ती (३०) याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याने प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणाला सहा दिवस उलटल्यानंतरही शाळेची मुख्याध्यापिका किंवा संस्थेचे सचिव, अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत. खामगाव येथील आश्रम शाळा, यवतमाळ पब्लिक स्कूल, होलीक्रॉस स्कूलला लावलेला न्याय तुली पब्लिक स्कूलसाठी का लावण्यात येत नाही, असा प्रश्न विचारण्यात येत असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शाळेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

आचाऱ्याकडून मुलींवर अत्याचार होत असल्याचा प्रकार शाळा व्यवस्थापनाच्या खूप आदीच लक्षात आला होता. त्यामुळेच १२ डिसेंबरलाच शाळा व्यवस्थापनाने आचाऱ्याला कामावरून कमी केले. परंतु शाळा व्यवस्थापनाने बदनामी टाळण्यासाठी आचाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यानंतर काही दिवसांनी हा पूर्ण प्रकार उघडकीस आला. शाळा व्यवस्थापनाला माहिती असतानाही त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा ठपका आदिवासी विकास विभागाच्या समितीने ठेवला आहे. तसेच  सोमवारी व्यवस्थापनाने शाळेतील इतर मुलींना व त्यांच्या पालकांना पत्रकार परिषद घ्यायला लावली आणि शाळेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असा दावा केला. यावरून शाळा व्यवस्थापन आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसतानाही पोलीस गप्प का? असा प्रश्न करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया देण्यास नकार

तुली पब्लिक स्कूल ही संस्था स्नेह महिला विकास संस्थेद्वारा संचालित करण्यात येते. या संस्थेची स्थापना राम मेघे यांनी केली. त्यानंतर मोहब्बत सिंग तुली यांनी ही संस्था मिळविली. या संस्थेद्वारा अनेक शिक्षण संस्था संचालित करण्यात येत असून अनेक वष्रे त्यांची पत्नी नरिंदर कौर यांनी संस्था सांभाळली. आता तुली संस्था समूहाच्या संचालिका उर्वशी यश रॉय या असून प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी टाळाटाळ केली.