भंडारा: भंडारा उपविभागातील भंडारा आणि पवनी पोलीस पाटील पदभरतीत झालेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने तसेच पोलीस पाटील पदभरती समितीने मौखिक गुण देताना दुजाभाव केल्याचे दिसून येत असल्याने सदर पोलीस पाटील भरतीकरीता राबविण्यात आलेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने पोलीस पाटील पद भरतीची प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार भंडारा उपविभागातील एकूण ४९ नवनियुक्त पोलीस पाटील यांना भंडारा उपविभागीय अधिकारी गजेंद्र बलपांडे यांनी कार्यमुक्त केले असून तसे आदेश काढण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील पोलीस पाटील आणि कोतवाल पदाच्या रिक्त पदांसाठी भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र सुरवातीपासूनच ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. भंडारा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या भंडारा आणि पवनी येथील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनियमितता, आर्थिक भ्रष्टाचार आणि एकूणच संपूर्ण प्रक्रियेत झालेला गैरप्रकाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. यात उमेदवारांनी दिलेल्या लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध न करता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व उमेदवारांना बोलविण्यात आले.

हेही वाचा… “मलाही दादांची ऑफर होती” आमदार शिंगणेंचा गौप्यस्फोट; ‘एमइटी’ च्या बैठकीलाही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

तसेच पोलीस पाटील भरती प्रक्रियेच्या नियमानुसार या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करून एका जागेसाठी निकषानुसार पात्र उमेदवारांनाच बोलवायला पाहिजे होते. परंतु तसे न करता सर्वच परीक्षार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला होता. सातत्याने केलेल्या त्यांच्या पाठपुराव्याची शासन आणि प्रशासनाला अखेर गंभीर दखल घ्यावी लागली. अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यात दोषी आढळलेल्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले.

हेही वाचा… अकोला: सत्तानाट्यावरून तरुणाचा संताप; थेट मतदान कार्ड काढले विक्रीला…

मात्र या भ्रष्टाचारातून ज्यांची पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यात आली त्यांचीही चौकशी व्हावी, आणि नव्याने भरती प्रक्रिया घेण्यात यावी यासाठी परमानंद मेश्राम यांनी लढा सुरू ठेवला होता. आता त्यांच्या या लढ्याला पुर्णतः यश मिळाले असून शासनाने पोलीस पाटील भरती प्रक्रिया नव्याने घेण्यास मान्यता दिली आहे. यानुसार भंडारा उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी भरती प्रक्रिया रद्द आली असून ४९ पोलीस पाटील यांना कायमस्वरुपी पदमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लढ्याला यश

भंडारा उपविभागात पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू होती. ती दोषपूर्ण असून त्यात अर्थपूर्ण आणि राजकीय पक्षाच्या एका जबाबदार पदावर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सरळ सहभाग असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यासाठी आंदोलनात्मक पाऊले उचलावी लागली. दोषपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या प्रशासनाने काढलेल्या नवीन सुधारित आदेशाचे मी जाहीर अभिनंदन करतो. पुढील भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होईल अशी अपेक्षा.