अमरावती : प्रत्यक्ष जोडप्याने लग्न केले नाही, कोणताही कायदेशीर सोहळा नाही, फक्त एक नियोजित कार्यक्रम जेथे मित्र लग्न साजरे करण्यासाठी, नाचण्यासाठी, ड्रेस अप आणि पार्टी करण्यासाठी एकत्र येतात. महानगरांमधील अशा कार्यक्रमांचे लोण आता अमरावतीतही पोहचले असून पोलिसांनी छापा टाकून अशा एका कार्यक्रमाचे आयोजन उधळून लावले.

शहरातील शंकरनगर मार्गावरील ‘एरिया ९१’ या हॉटेलमध्ये एकूण शंभरावर युवक युवतींचा संगीत वाद्यांसह गोंधळ सुरू होता. रविवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी अनेक युवक युवती याठिकाणी मद्यधुंद होऊन नाचत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

‘द फेक वेडिंग’ या नावाने समाज माध्यमांवर जाहिरात करण्यात आली होती. हे लग्न खोटे असले तरी यात लग्नाचा खरा आनंद लुटता येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. या ‘फेक वेडिंग’ची पार्टी रंगात येताच हॉटेलवर छापा टाकला. तेथील धिंगाणा पाहून पोलीसही थक्क झाले. छोट्याशा जागेत अनेक युवक युवती दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सर्वात आधी कर्णकर्कश वाद्ययंत्रे बंद केली. त्यानंतर पार्टीत सहभागी झालेल्यांना ताब्यात घेण्यात आले. तरूणींना समज देऊन सोडून देण्यात आले.

या ‘फेक वेडिंग पार्टी’मध्ये सहभागी होण्यासाठी तरूणांकडून ४०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते, तरुणींना मात्र मोफत प्रवेश देण्यात आला. पाश्चिमात्य शैलीत सर्व कार्यक्रम राहतील, असे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले होते.

कायद्यानुसार २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दारू देणे हा गुन्हा आहे. याठिकाणी हॉटेल चालकाने सर्व अल्पवयीन युवक युवतींना दारू दिली. ही पार्टी म्हणजे कायदा आणि व्यवस्था धोक्यात आणणारी होती. पार्टी आयोजक आणि हॉटेल चालकांवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक महानगरांमध्ये, छतावरील हॉटेल्स, पब आणि पॉप-अप ठिकाणी एका नवीन प्रकारचा उत्सव साजरा होत आहे. हे कार्यक्रम पारंपारिक भारतीय लग्नांसारखे दिसतात, ज्यात जोरदार ढोल, फुलांचा वर्षाव, नृत्यदिग्दर्शित संगीत, सादरीकरणे आणि अगदी पुजारी देखील असतात. पण प्रत्यक्ष लग्नात कोणतेही जोडपे अडकत नाही. पालकांनी निवडलेल्या पाहुण्यांची यादी नाही. फक्त संगीत, नृत्य, जेवण आणि रात्रीसाठी एका चमकदार कल्पनारम्यतेत स्वतःला हरवून जाण्याची संधी म्हणून या नवीन प्रकाराकडे पाहिले जात आहे. पण, अशा कार्यक्रमांच्या आडून व्यसनाधिनतेचे खेळ करणे हे गैर आहे, अशी प्रतिक्रिया अमरावतीकरांमध्ये उमटली आहे.