नाशिक : सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी, चोऱ्यांचे वाढते प्रमाण, अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अशा उद्योजक आणि कामगारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) वतीने आयोजित बैठकीत लक्ष वेधण्यात आले. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत पोलीस बंदोबस्त वाढविला जाईल. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ, अशी ग्वाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.
औद्योगिक सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि वसाहतीतील समस्या उद्योजकांना थेट मांडता याव्यात, यासाठी निमा सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात पोलीस आयुक्त कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजकांनी मागण्यांचे निवेदन दिले. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर झाल्याने औद्योगिक वसाहत परिसरात गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणात पोलीस बळही उपलब्ध होईल, असे कर्णिक यांनी नमूद केले. या पोलीस ठाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सीमा हिरे, निमा आणि आयमा या औद्योगिक संघटनांचे त्यांनी आभार मानले. देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे उद्योजक आणि कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेणे ही आमची जबाबदारी असून ती चोखपणे पार पाडू, असे आश्वासन कर्णिक यांनी दिले.
यानिमित्ताने औद्योगिक विकासातील अडचणी थेट पोलीस आयुक्तांपर्यंत मांडण्याची संधी उद्योजकांना मिळाल्याबद्दल निमाचे उपाध्यक्ष मनिष रावल यांनी आभार मानले. बैठकीस कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, कैलास पाटील, नितीन आव्हाड, मिलिंद राजपूत, किरण खाबिया, सचिन कंकरेज, संजय राठी, नानासाहेब देवरे, श्रीकांत पाटील, ललित सुराणा, विरल ठक्कर आदी उपस्थित होते.
वाढत्या चोरींमुळे चिंता
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतील गुन्हेगारीने डोके वर काढल्याने आणि विशेषतः चोरींचे प्रमाण वाढल्याने उद्योजक, कामगार वर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे परिसरात रात्रीची गस्त वाढवावी. औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केली. औद्योगिक माल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी. सीसीटीव्हीचे जाळे विस्तारणे, बेकायदा व अवैध धंद्यांना तसेच वाढत्या अतिक्रमणांना आळा घालावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
वाहतूक कोंडीची समस्या
औद्योगिक वसाहतीत सातत्याने मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी, अनधिकृत थांबे, गरवारे ते डीजीपी नगर आणि द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक समस्या याकडे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या तारखांना होणाऱ्या चोरी व दमदाटीच्या घटना लक्षात घेता सुरक्षा वाढवावी, अशी मागणी निमाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी केली. यावेळी प्रत्येक कारखान्याच्या बाहेरील भागात किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे असल्याचे आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.