नागपूर: प्रत्येकाने चांगले काम करायलाच हवे. त्याचे श्रेय निश्चित मिळते. पण आम्ही मंत्री, राजकारणी यांच्या जवळचे कंत्राटदार, आर्टिटेक्ट असतात. याला काम द्या, त्याला देऊ नका असा, सरकारी अधिकाऱ्यांवर दबावही असतो. त्यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचे काम करायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशनल सेंटर येथे झालेल्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे ,आयबीसी चे अध्यक्ष सी देबनाथ, आय.बी.सी. राज्य अध्यक्ष सुभाष चांदसुरे, आय.बी. सी.चे राष्ट्रीय अध्यक्ष चिन्मय देबनाथ, व्ही.आर. बन्सल, सचिव व्ही.आर. बन्सल, उपाध्यक्ष अविनाश गुल्हाने उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्ता पूर्ण दृष्टिकोन बाळगून कमी बांधकाम खर्चामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच किफायतशील बांधकाम सामग्रीचा वापर करून गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता चांगले बांधकाम करायला हवे.
इंडियन रोड काँग्रेसच्याच धरतीवर इंडियन बिल्डिंग काँग्रेसचे एक कार्यालय स्थापन करून त्यामध्ये निरंतर संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून गुणवत्तापूर्ण आणि दर्जात्मक संशोधन केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. बांधकाम क्षेत्रात चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे असे सांगताना गडकरी यांनी जे अधिकारी कामकाजात हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असा, इशारा दिला. कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये लँडस्केपिंग, पर्यावरण पूरक बांधकाम, दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा असल्या पाहिजे. त्याचबरोबर जलसंधारणा करिता तसेच सांडपाणी व्यवस्थापनाकरिता देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. याप्रसंगी इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक अहवालाचे देखील प्रकाशन केले तसेच गुणवंत अभियंतांचा तसेच अधिकाऱ्यांचा देखील सत्कार केला.
इंडियन बिल्डिंग काँग्रेसबाबत…
इंडियन बिल्डिंग काँग्रेस ही प्रशासक, वित्तपुरवठादार, नियोजक, वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते, सार्वजनिक आरोग्य अभियंते, विद्युत अभियंते, ऊर्जा अभियंते, यांत्रिक अभियंते, पर्यावरणशास्त्रज्ञ, बागायतदार, बांधकाम साहित्याचे उत्पादक, संशोधक, शिक्षक इत्यादी संबंधित सर्व व्यावसायिकांना एकाच मंचावर एकत्र आणून देशात शाश्वत बांधकाम तसेच निर्मितीसाठी काम करणारी एक संस्था आहे .या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असून यावर्षी वार्षिक सभेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते .