सेना, राष्ट्रवादी, ‘आप’कडून भाजप व एनएचआयच्या विरोधात आंदोलन

नागपूर : शहरातील कळमना भागातील राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाण पुलाचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेचे बुधवारी शहरात राजकीय पडसाद उमटले. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप करत एनएचआय व भारतीय जनता पक्षाचा निषेध करत संबंधित अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आम आदमी पक्षाने आंदोलन केले. या दुर्घटनेवरून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून राजकारण सुरू झाले आहे.

शिवसेनेची निदर्शने

सदर घटना घडलेल्या परिसरात शिवसेनेच्यावतीने संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे व शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.  पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर व एनएचआयच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

यावेळी शिवसेनेने नागपूर महापालिका आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजप विरोधात आंदोलन करत सरकारचा निषेध केला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विभागाचे काम योग्य नसून नागपुरातील विविध रस्त्यांचे आणि उड्डाणपुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असून या विरोधात शिवसेनेकडून सदर आंदोलन करण्यात आल्याचे नितीन तिवारी यांनी सांगितले. आंदोलनात दीपक कापसे, नगरसेविका मंगला गवरे, किशोर पराते, हितेश यादव, नाना झोडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे व प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र आंदोलकांना कार्यालयाच्या बाहेर अडवण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी राजीव अग्रवाल आंदोलकांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत उड्डाणपुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप सरकार व एनएचआयमधील अधिकारी व कंत्राटदारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राजीव अग्रवाल यांनी पूल दुर्घटनेची चौकशी होणार असून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी दिल्लीतून खास पथक येणार असल्याची माहिती दिली. तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही.  दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची तसेच उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि त्याच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना एनएचआयच्या कार्यालयात प्रवेश दिला नाही. तेव्हा पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.

‘आप’कडून अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी 

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कळमना येथे राज्य समिती सदस्य व विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे आणि राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. उड्डाणपूल बांधकामात मोठय़ा प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अशोक मिश्रा, अमरीश सावरकर, डॉ. जाफरी, राकेश उराडे, कृतल वेलेकर आदी उपस्थित होते.