नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात मतमोजणी प्रक्रियेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, काँग्रेस आता सत्ताधाऱ्यांविरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर शहरात काँग्रेस मतचोरीच्या आरोपांवरून ‘कॅन्डल मार्च’ काढणार आहे.
नागपूर शहर जिल्हा काॅग्रेसच्यातर्फे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (१४ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता व्हेरायटी चौक ते संविधान चौकापर्यत कॅन्डल मार्चचे आयोजन केले आहे.
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीमध्ये घोटाळे करुन, मतचोरी करुन गैरमार्गाने निवडणुकीत विजय मिळवून सत्ता प्राप्त केली आहे. काॅग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे. मतचोरी करुन गैरमार्गाने सत्ता मिळविणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे. मतदार याद्यामध्ये मोठया प्रमाणावर घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झालेली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनतेने राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठया प्रमाणात घोटाळे उजेडात आणले आहेत. आता ठिकठिकाणी भाजपच्या मतचोरी विरुद्ध आंदोलन करण्यात येत आहेत.
नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात सुमारे ३३ हजार मते वाढल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांनी केला होता. हा मतदारसंघ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, त्यामुळे या मुद्द्याला अधिकच राजकीय वळण लागले आहे. तर शेजारच्या कामठी मतदारसंघात देखील मतदार वाढले आहेत. या मतदारसंघातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत.
गुडधे यांनी सांगितले की, मागील निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदारसंख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. या वाढीबाबत निवडणूक आयोगाकडे ठोस तक्रारी करण्यात आल्या असून, त्याचा तपास होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार याद्यांमध्ये फेरफार करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. मतांची वाढ ही फक्त नैसर्गिक लोकसंख्यावाढ नाही, तर संगणकीय छेडछाड आणि बनावट नोंदणीमुळे झाल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नागपूरमध्ये मशाल मोर्चा काढण्यात येणार असून, फडणवीस आणि निवडणूक यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राजकीय तज्ञांच्या मते, फडणवीस यांच्या मतदारसंघात असा आरोप होणे म्हणजे भाजपसाठी प्रतिमा डागाळणारे ठरू शकते. काँग्रेसने मागणी केली आहे की, संपूर्ण मतदारसंघात फेरतपासणी होऊन प्रत्येक नव्या मतदाराची योग्यरीत्या पडताळणी व्हावी.