नागपूर : कर्करोगातून बाहेर आलेल्या रुग्णांना हा आजार पुन्हा होऊ नये म्हणून कर्करोग तज्ज्ञ शरीरात या आजाराविरोधात लढण्याची प्रतिकार शक्ती विकसित करण्यासाठी ‘इम्युनोथेरपी’चा सल्ला देतात. परंतु, शासकीय आरोग्य योजनेत ‘इम्युनोथेरपी’चा समावेश नाही. त्यामुळे गरीब रुग्ण महागडी ‘इम्युनोथेरपी’ घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना भविष्यात कर्करोगाचा धोका कायम राहण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
प्रदूषण, बदलती जीवनशैली, खानपानाच्या वाईट सवयींसह इतर अनेक कारणांनी महाराष्ट्रासह देशभरात कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजनेतून उपचाराची सोय आहे. परंतु, या योजनेत रुग्णावर पारंपरिक ‘किमोथेरपी’ किंवा ‘रेडिओथेरपी’द्वारेच उपचार उपलब्ध आहे. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात यापैकी अनेक रुग्णांना ‘इम्युनोथेरपी’चा सल्ला कर्करोग तज्ज्ञ देतात. त्यामुळे रुग्णाची कर्करोगाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती विकसीत होते तसेच कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यासही मदत होते.
कर्करोगातून बाहेर आलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कर्करोगाच्या पेशी तयार होऊन हा आजार होऊ नये म्हणून ‘इम्युनोथेरपी’चा सल्ला दिला जातो. परंतु, वरील शासकीय योजनेत या थेरपीचा समावेश नाही. त्यामुळे या योजनेशी संलग्न रुग्णालयात ‘इम्युनोथेरपी’चा उपचार नि:शुल्क होत नाही. या उपचारासाठी रुग्णांना दीड ते दोन लाखाहून अधिक खर्च करावा लागतो. दुसरीकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतूनही या थेरपीसाठी निधी मिळत नाही. त्यामुळे गरिबांना हा उपचारच घेता येत नाही. त्यामुळे या थेरपीचा समावेश सरकारी योजनेत करण्याची मागणी केली जात आहे.
कर्करोग तज्ज्ञ काय म्हणतात?
इम्युनोथेरपी ही आधुनिक वैद्यकातील एक अत्यंत महत्त्वाची आणि आशादायक उपचार पद्धत आहे. ती शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला बळकटी देऊन कर्करोगासह इतरही अनेक गंभीर आजारांवर दीर्घकालीन उपाय उपलब्ध करून देते, अशी माहिती नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुगालयातील कर्करोग विभागाचे प्रमुख डाॅ. अशोक दिवान यांनी दिली. नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाचे मानद सल्लाकार कर्करोग तज्ज्ञ डाॅ बी.के. शर्मा म्हणाले, पारंपरिक ‘किमोथेरपी’ किंवा ‘रेडिओथेरपी’पेक्षा ‘इम्युनोथेरपी’ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करते आणि निरोगी पेशींचे नुकसान कमी करते. काही प्रकरणांमध्ये कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता कमी होते. या थेरपीचे इंजेक्शन महाग असल्याने गरिबांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सरकारी योजनेत ‘इम्युनोथेरपी’ आल्यास रुग्णांना लाभ शक्य आहे.
अधिकारी काय म्हणतात ?
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची योग्य अंमलबजावणी होत असून कर्करुग्णांनाही लाभ होत आहे. कर्करुग्णांसाठी ‘इम्युनोथेरपी’ आवश्यक असल्यास त्याचा योजनेत समावेशाबाबत संबंधित योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या रुग्णालयांकडून मागणी झाल्यास त्याबाबत विचार होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयाने किमान ई-मेलद्वारे आम्हाला मागणी कळवायला हवी.” – अन्नासाहेब चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुंबई.
