मंत्री असभ्य भाषेत बोलत असल्याचा आरोप; सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचा संपाचा इशारा
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे तक्रारींची शहानिशा न करता थेट वीज क्षेत्रातील कनिष्ठापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलून त्यांचा अपमान करतात. त्यांना सौजन्याने बोलण्याची शिकवण देण्याची गरज असून नागपूर जिल्ह्य़ातील तिन्ही वीज कंपन्यातील अभियंत्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या बैठकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांची वागणूक सुधारली नाही तर संपाचाही इशारा सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना दिला आहे.
राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही कंपन्यात हजारो अभियंते सेवा देत आहेत. नागपूर जिल्ह्य़ाला प्रथमच ऊर्जामंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपाने मिळाल्याने येथील विजेशी संबंधित प्रकल्पांना गती मिळून येथील कामगार,अधिकाऱ्यांचे सगळे प्रश्न सुटण्याची आशा व्यक्त केली जात होती. परंतु उलट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील तिन्ही वीज कंपनीतील अधिकाऱ्यांसह कामगारांचा छळ सुरू केलाचा आरोप विविध कामगार आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी केला आहे.
ऊर्जामंत्र्यांकडून वारंवार बैठकांसह वेगवेगळ्या ग्रामीण भागात सभा घेतल्या जातात. सभेत तक्रार दिल्यास त्याची शहानिशा न करता थेट अभियंत्यांशी असभ्य भाषेत बोलून त्यांचा सार्वजनिक अपमान केल्या जातो. शनिवारी गोंडखैरी येथेही दोन अभियंत्यांचा सार्वजनिक अपमान केल्याचा आरोप संघटनेने केला. याप्रसंगी अभियंत्यांचा दोष नसतांनाही वारंवार निलंबनाची धमकी देण्यात आली. हा प्रकार अभियंत्यांवर अन्याय करणारा आहे. ऊर्जामंत्र्यांची वर्तणूक बघता आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने त्यांच्या नागपूर जिल्ह्य़ातील सभा वा बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही हा प्रकार घडल्यास सगळे अभियंते संपावर जाण्याचा इशाराही महावितरणच्या नागपूर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आला.
सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन ही महावितरणची सर्वात मोठी अभियंत्यांची संघटना आहे. कंपनीतील प्रत्येक अभियंता हा ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याकरिता प्रयत्न करत असतो. परंतु हल्ली त्यांना ऊर्जामंत्री अपमानीत करीत आहेत. अभियंत्यांच्या सन्मानाकरिता संघटना आंदोलन करणार असून पुढे हा प्रकार घडल्यास सगळे अभियंते संपावर जाणार आहेत.
– चंद्रकांत देशमुख, माजी सहसचिव, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन.