लोकसत्ता टीम

नागपूर : विदर्भासह राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच महावितरणच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ६६० मेगावॅटचा एक संच बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला होता. हा संच आता सुरू झाल्याने आता महानिर्मितीची वीजनिर्मिती वाढली आहे.

राज्यातील काही भागात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमान वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्र, कृषीपंपांचा वापरही वाढत आहे. त्यातच १७ मार्चला कोराडीतील ६६० मेगावॅटचा युनिट क्रमांक १० हा संच बंद पडल्याने महानिर्मितीची वीजनिर्मिती कमी झाली होती. परंतु, २४ मार्चला संच सुरू झाल्याने आता वीजनिर्मिती वाढली आहे. दरम्यान संच बंद झाल्यावर २३ मार्चला महानिर्मितीची औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील वीजनिर्मिती ५ हजार ६८५ मेगावॅट दरम्यान नोंदवण्यात आली होती. संच सुरू झाल्यावर २८ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ७.२० वाजता ही वीजनिर्मिती ६ हजार ७९७ मेगावॅटवर पोहचली आहे. या वृत्ताला एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या

राज्यात विजेची मागणी साडेसत्तावीस हजार मेगावॅटवर

राज्यात २८ मार्चच्या संध्याकाळी ७.२० वाजता विजेची मागणी २७ हजार ५८२ मेगावॅट होती. त्यापैकी महावितरणची मागणी २२ हजार ६७६ मेगावॅट होती. तर मागणीच्या तुलनेत राज्याला महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातून ६ हजार ७९७ मेगावॅट, गॅस उरन प्रकल्पातून २७७ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून १ हजार २२९ मेगावॅट, केंद्राच्या वाट्यातून ९ हजार ४५० मेगावॅट वीज मिळत होती. तर खासगीपैकी अदानीकडून ३ हजार १७६ मेगावॅट, जिंदलकडून ९३१ मेगावॅट, आयडियलकडून २६५, रतन इंडियाकडून १ हजार ८३ मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ४३२ मेगावॅट वीज मिळत होती.