रेल्वे इंजिन प्रवासी गाडय़ा, मालगाडय़ा ओढण्याचे काम करते, हे सर्वाना माहिती आहे. परंतु आता घाटावरून उतरताना रेल्वे इंजिन वीजनिर्मिती करीत असून यातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या सात महिन्यात सात कोटी आठ लाख रुपयांची वीज बचत केली आहे.
रेल्वेत विद्युत इंजिनचा वापर वाढला आहे. विद्युतीकरण न झालेल्या भागात किंवा आपात्कालीन स्थितीत डिझेल इंजिनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेत विजेचा वापर प्रचंड आहे. त्यासाठी रेल्वे वीज खरेदीवर भरपूर खर्च करते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गेल्या सात महिन्यात ९० लाख ४४ हजार ५८५ युनिट वीज वापरल्या गेली. देशभरात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. यावर उपाय शोधण्याचा एक भाग म्हणून मध्य रेल्वे वीज बचत आणि वीज पुननिर्मितीसाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात वीज बचत तसेच वीज पुननिर्मिती होऊ लागली आहे. यासाठी रनिंग स्टॉफचे नियमित समुपदेशन केले जात आहे. त्याचा परिणाम दिसून आला असून सात महिन्यात १४७५४३५६ युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यामुळे रेल्वेची प्रतियुनिट ४.८० रुपयेप्रमाणे ७ कोटी ८ लाख २० हजार ९०९ रुपयांची बचत झाली आहे.
अजनी लोको शेडमध्ये २२० रेल्वे इंजिन आहेत. त्यातील १६६ इंजिनमध्ये वीज पुनर्निर्मिती करण्याची क्षमता आहे. ‘व्ॉग-९’ या प्रकारचे शक्तिशाली इंजिन घाट सेक्शनसाठी वापरण्यात येत आहे. नवीन इंजिनमधील ‘३-फेज’ रेल्वे इंजिनचा वापर वाढला आहे. नागपूर-इटारसी मार्गावर धाराखो ते तिगाव दरम्यान घाट सेक्शन आहे. इंजिन चालक या भागातून गाडी चालवताना कौशल्याचा वापर करत अधिकाधिक वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अत्याधुनिक इंजिनला कमी वीज लागते. तसेच त्यातून विजेची पुनर्निर्मिती होते. घाट किती उंचीचा आणि किती लांबीचा आहे, यावर वीजनिर्मितीची क्षमता अवलंबून असते. ‘३-फेज’ रेल्वे इंजिनमुळे वीजनिर्मिती होते. तिगाव घाट सेक्शन १७ कि.मी., आहे. पाच टन लोडसह साधारणत: गाडीला उतरण्यास अर्धा तास लागतो. यातून सुमारे ९०० युनिट वीजनिर्मिती होते, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले.
अशी होते वीजनिर्मिती
नागपूर-इटारसी मार्गावर धाराखो ते तिगाव दरम्यान घाट आहे. उतारावरून खाली गाडी येताना गाडीची गती वाढते. त्यामुळे ब्रेक लावावे लागतात. इंजिनच्या मोटारमध्ये ‘डायनामिक ब्रेकिंग’ची व्यवस्था आहे. यात दोन पर्याय आहेत, एअर ब्रेक आणि दुसरा रिजनरेटिव्ह. दुसरा पर्याय निवडल्यास इंजिन हे वीजनिर्मिती केंद्रासारखे काम करते. येथे तयार झालेली वीज ग्रीडकडे पाठवली जाते. गाडीची गती जेवढी अधिक तेवढी वीजनिर्मिती अधिक होते. यासाठी मोटारमध्ये इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करण्यात आला आहे.