अकोला : आयुष्यभर समाजसेवेचा वसा जोपासल्यानंतर जगाचा निरोप घेतल्यावर देखील नश्वर देहाचा समाजहितासाठी उपयोग व्हावा, असा अनमोल विचार समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. अकोल्यातील सेवाभावी नारे दाम्पत्याने ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ ही उक्ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत कृतीतून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. १० वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी प्रभाताई नारे यांचे सुद्धा देहदान करण्यात आले होते. सेवाव्रती नारे दाम्पत्याचे हे पाऊल समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
अकोल्यातील प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे यांचे बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य तथा शिक्षण तज्ज्ञ डॉ. गजानन नारे यांचे ते वडील होत.
साहेबराव नारे यांची अंतिम इच्छा त्यांचे पूत्र डॉ. गजानन नारे यांनी पूर्ण केली. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दुपारी १२ वाजता देहदान करण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभात किड्स येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
१० वर्षांपूर्वी प्रभाताई नारे यांचे देहदान
२०१५ मध्ये साहेबराव नारे यांच्या पत्नी व डॉ.गजानन नारे यांच्या आई प्रभाताई नारे यांचे देखील अंतिम इच्छेनुसार देहदान केले होते. प्रभाताई नारे अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांनी सुद्धा आयुष्यभर सामाजिकभान जोपासत सेवाकार्य केले. साहेबराव नारे व प्रभाताई नारे हे अत्यंत प्रगत विचारांचे होते. जीवनभर त्यांनी समाजाचा विचार केला. मृत्युनंतरही आपल्या देहाचा उपयोग आरोग्य शिक्षणासाठी व्हावा, हा उदात्त विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून समाजाला त्यांनी नवी प्रेरणा दिली आहे.
आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य; सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवा
साहेबराव नारे मूळचे अकोट तालुक्यातील विटाळी सावरगाव येथील रहिवाशी होते. शिक्षकी पेशात आयुष्यभर त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. साहेबराव नारे यांच्या निधनामुळे अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.