अकोला : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. विकास संवाद सभा आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळाकडे निघाला असतांना मार्गात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे अमरावती येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती देखील खालावली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन छेडले. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला शहराच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा प्रहार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी अगोदरच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आज सकाळीच ताब्यात घेतले. त्यांना शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये स्थानबद्ध करण्यात आले. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा देखील अधिकार नसून राज्यात एक प्रकारे हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप स्थानबद्ध झालेल्या पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, आणखी अनेक कार्यकर्ते बाहेर आहेत. ते आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली नियोजित सभा आटोपून शिवणी विमानतळाकडे निघाले असतांना मार्गात प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
अकोला जिल्ह्यात दोन हजार ५८८ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीच्या विविध २१ विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचन, रस्ते, रुग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आ. रवींद्र चव्हाण, आ. हरिष पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. श्याम खोडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.