scorecardresearch

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बिएनएचएस) या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी भारतातील  वन्यजीव संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून ती १४० वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी भारतात व भारताबाहेर मोठे काम करीत आहे.

Praveen Singh Pardeshi
प्रवीणसिंह परदेशी

नागपूर : भारतातील सर्वात प्राचीन व प्रख्यात अश्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बिएनएचएस) या संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या या संस्थेचे  उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.  बिएनएचएसच्या गव्हर्निंग कौन्सिलने त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी भारतातील  वन्यजीव संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून ती १४० वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी भारतात व भारताबाहेर मोठे काम करीत आहे. अनेक पक्षी व वन्यजीव संशोधन, निसर्ग शिक्षण आणि जनजागृतीवर आधारित कृतीद्वारे निसर्गाचे संवर्धन, प्रामुख्याने जैविक विविधता वाचवणे हे संस्थेचे धेय आहे. प्रवीणसिंह परदेशी पूर्वीपासूनच वन्य जीव प्रेमी म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी जगातील अनेक देशांमधील वन्यजीव व्यवस्थापनाचा खोलवर अभ्यास केला आहे.

हेही वाचा >>>> समृद्धी महामार्गावर वेगाने वाहने चालवणाऱ्यांना समुपदेशनाची सक्ती

प्रवीणसिंह परदेशी १९८५ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. परदेशी यांनी प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत विविध पदे भूषवली आहेत. परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिले. त्यांनी मुंबई महापालिकेत २०१९ मध्ये आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास तसेच महसूल या महत्त्वांच्या खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे. प्रवीण परदेशी यांनी केंद्रात पंतप्रधान कार्यालयात गठित राष्ट्रीय क्षमता आयोगाच्या सदस्यपदी  काम पाहिले आहे. तसेच नुकतेच त्यांची राज्याच्या निती आयोगाच्या म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन- मित्र या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 16:14 IST

संबंधित बातम्या