देशावर लादलेले कृषी कायदे मागे घेण्यासाठी लावलेला १० महिन्याचा विलंब, या आंदोलनातील मृत शेतकऱ्यांना मदत जाहीर न करणे, देशात वाढलेल्या बेरोजगारीसह इतर मुद्यांवर आंतराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी सोमवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे उद्योजकांच्या फायद्याचे होते. त्यामुळे शेतमालाचा व्यवहार निवडक उद्योजकांच्या हाती गेला असता. याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले. त्यानंतर कृषी कायदे मागे घेण्यासाठी सरकारने दहा महिने लावले. त्यामुळे ७०० शेतकऱ्यांचा जीव गेला.  या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करणे अपेक्षित आहे. परंतु तेही होत नसल्याने या सरकारकडे अफगाणिस्तानला देण्यासाठी पैसा आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी नाही काय? हा प्रश्न उपस्थित होतो. सध्या अयोध्येत राम मंदिर होताना दिसत आहे. परंतु देशातील १ कोटी लोक बेघर, १९ कोटी नागरिक उपाशी, शेतकऱ्यांवर कोट्यवधींचे कर्ज दिसत असल्याने रामराज्य मात्र दिसत नाही. आता काशी- मथुरातील मंदिरबाबत चर्चा होतांना दिसत आहे. परंतु केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असल्याने आता चर्चा नको तर सरकारन हे मंदिर तातडीने बांधण्यासाठीचा कायदाच करण्याची गरज असल्याचे तोगडिया यांनी सांगितले.

सरसंघचालकांनाच विचारा

सलग तीस वर्षांहून अधिक कालावधीपासून मी संघाबरोबर राहिलो. नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यावर डोक्यावर सामानाची पेटी घेऊन मी संघाच्या वास्तूत जात होतो. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही माझे चांगले संबंध होते. आजही मी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह देशातील प्रत्येक हिंदूला स्वत:चेच मानतो. मी सबका साथ-सबका विकास असे बोलत नसून सर्वांना आपले मानतो. समाजकारणासाठी मी घर व डॉक्टरीही सोडली. मी स्वत:ला संघासोबत कुठे बघतो हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारल्यास मलाही ते कळू शकेल, असे प्रवीण तोगडिया म्हणाले.

काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी एका पुस्तकात हिंदूंबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या  प्रश्नावर तोगडिया यांनी काही श्वान भुंकत असतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हणत या मुद्यांवर मी बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या

राम मंदिर आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, र्विंहपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस, महंत अवैद्यनाथ या चौघांनी महत्वाची भूमिका बजावत हिंदूंचे जनजागरण केले होते. त्यामुळे या चौघांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणीही तोगडिया यांनी यावेळी केली.