गडचिरोली : भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिम्मा हिला २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०० वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाच्या मदतीने पामूलगौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नदी पार करून तिला तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सकाळी तिने गोंडस कन्येला जन्म दिला आहे.
छत्तीसगड राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पर्लकोटा व पामूलगौतम नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे भामरागड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कालच याची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सिरोंचा येथून ‘एसडीआरएफ’चे पथक रात्री अकरा वाजता भामरागडला रवाना झाले. पहाटे चारच्या सुमारास पथकाने अर्चनाला पुरातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या जलद कारवाईमुळे प्रसूतीवेळी होणारा मोठा अनर्थ टळला, असे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले.
दरम्यान, भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचे पाणी शिरले. तब्बल ३० ते ३५ दुकानांत पाणी गेल्याने व्यापारी हवालदिल झाले होते. मात्र प्रशासनाने दिलेल्या पूर्वसूचनेमुळे व्यापाऱ्यांनी कालच आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे मोठे नुकसान टळले. महिनाभरात भामरागडला तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे.
यंदा दक्षिण गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे भामरागडचा महिनाभरात तिसऱ्यांदा संपर्क तुटला असून शहरात पाणी गेल्याने पूर प्रवण क्षेत्रातील घरांना आणि दुकानांना रिकामे करावे लागले. त्यामुळे संबंधितांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने आधीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवून तत्काळ कारवाई सुरू केल्याने नुकसान मर्यादित राहिले, असे स्थानिकांचे मत आहे.
पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने प्रशासनाने सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: आरोग्य विभाग, महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन शाखांना तातडीच्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनीही नदीकाठी किंवा धोक्याच्या भागात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.