राज्यस्तरीय ‘लोकसत्ता लोकांकिका’चे सहावे पर्व

नागपूर : महाविद्यालयीन तरुणाईच्या सर्जनशीलतेला वाव देत त्यांच्यातील कलावंताला दिशा देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सहावे पर्व येत्या पाच डिसेंबरपासून राज्यात सुरू होत आहे. राज्यातील आठही केंद्रांवर ५ ते ११ डिसेंबरदरम्यान प्राथमिक फेरी रंगणार आहे. नागपूर येथील प्राथमिक फेरी ६ आणि ७ डिसेंबरला रंगणार आहे.

नाटय़क्षेत्रात मानाची म्हणून ओळखली जाणारी लोकसत्ताद्वारे आयोजित ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहाकार्याने पार पडत आहे. ‘आयओसीएल’ पॉवर्ड बाय असलेल्या या स्पर्धेकरिता मे.बी.जी. चितळे डेअरी हे असोसिएट पार्टनर आहेत. दरवर्षीप्रमाणे लोकांकिकाच्या व्यासपीठावरील गुणवंत कलाकारांना नाटय़ क्षेत्रासाठी दार खुले करून देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे यावर्षीही स्पर्धेचे टॅलेन्ट पार्टनर आहेत. प्रत्येक केंद्रावरील प्राथमिक फेरीतून निवडल्या गेलेल्या उत्कृष्ट एकांकिका विभागीय अंतिम फेरीत दखल होतील. त्यानंतर प्रत्येक विभागातून निवडलेली सर्वोत्कृष्ट एकांकिका मुंबईत रंगणाऱ्या महाअंतिम फेरीत आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राज्यातील एकूण आठ सर्वोत्कृष्ट एकांकिकामधून महाराष्ट्राची ‘लोकसत्ता लोकांकिका’ निवडली जाणार आहे.