लोकसत्ता टीम

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण त्यांचे काही चालत नसल्याचे दिसून येत आहे. मोदींना पराभव जवळ दिसत असल्याने ज्या पक्षाला नकली म्हणतात, त्याच पक्षाच्या प्रमुखाला आपल्यासोबत येण्याची खुली ऑफर देत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते आज त्यांच्या नागपूर निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. तो संदर्भ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबार येथील प्रचारसभेत थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. मोदींची ही ऑफरवर पराभूत मानसिकतेतून आलेली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

आणखी वाचा-मोदींच्या वक्तव्यांनी देशाची मान शरमेने खाली, विजय वडेट्टीवार यांची टीका

ते म्हणाले, भाजपाने लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारची ‘कार्ड’ खेळून बघितले. पण त्याला जनतेने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींना दररोज नवे ‘कार्ड’ वापरावे लागत आहे. ज्यांच्यावर कालपर्यंत कठोर टीका केली त्यांनाच ऑफर देण्याची वेळ मोदी यांच्यावर आली आहे. मोदी यांची शरद पवारांना ऑफर देणे म्हणजे ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार या राहुल गांधी यांच्या विधानाला नरेंद्र मोदी यांचा दुजोराच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम मंदिराचे शुद्धीकरण

शंकराचार्यांनी अयोध्येतील राम मंदिरबाबत घेतलेल्या भूमिकेशी काँग्रेस सहमत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शंकराचार्यांच्या माध्यमातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल. तसेच श्रीरामांचा भव्य दरबार लावण्यात येईल, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले.