लोकसत्ता टीम

नागपूर: युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना – २०२५ सुरू करण्यात आली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना खाजगी संस्थांमध्ये कामाचा अनुभव मिळेल, त्यांना रोजगारक्षम बनविण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून याची मुदत १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नोंदणी करा, आपला प्रोफाइल तयार करा आणि विविध क्षेत्रांमधील संधींसाठी अर्ज करा.

नोंदणी किंवा अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. आजच अर्ज करा. सहभागी ५०० कंपन्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रत्येक इंटर्नसाठी भारत सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होईल आणि इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी https://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्या.

पात्रता निकष : अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. अर्जदाराचे वय २० ते २४ वर्षे (अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार) असावे. अर्जदार पूर्णवेळ नोकरीत किंवा नियमित शिक्षण घेत नसावा. मात्र, ऑनलाइन किंवा दूरशिक्षणाद्वारे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता : दहावी पास, बारावी पास, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलिटेक्निक डिप्लोमाधारक, स्नातक पदवी जसे बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए, बीफार्म यापैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतो.

मुख्यमंत्री फेलोशिपचाही लाभ घेता येणार

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमांतर्गत राज्यातील ६० तरुणांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या फेलोंना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे, देखील म्हटले आहे.नियुक्तीसंदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.