यवतमाळ : उमरखेड येथील एका खासगी स्कूलच्या बसला शनिवारी सकाळी पळशी फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात नवव्या वर्गातील एक विद्यार्थीनी ठार झाली. महिमा आप्पाराव सरकाटे (१५), रा. दिवटी पिंपरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या अपघातात स्कूल बस मधील इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान घटना घडली. स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलची बस दिवटीपिंपरीवरून दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. स्कूल बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस झाडावर आदळून उलटली. यात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनी आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेबद्दल पालकमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ दखल घेवून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना घटनास्थळी तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश दिले. तसेच या अपघतासाठी दोषी असणाऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील सर्वच शाळांच्या स्कूल बसची तपासणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. तसेच घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या.