नागपूर : नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांची आजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आदेशाला दोन दिवस झाल्यानंतरही कागदपत्राची पूर्तता अभावी बुधवारी सुटका होऊ शकली नव्हती. मात्र गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रा. साईबाबा कारागृहाबाहेर आले. त्यांची पत्नी, भाऊ, मित्र आणि वकील हे कार मधून साईबाबा यांना घराकडे रवाना झाले.

हेही वाचा >>> खासदार भावना गवळी यांचे तिकीट कटणार? महायुतीकडून चंद्रकांत ठाकरे की राजू पाटील राजे!

७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबासह महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर, विजय नान तिरकी व पांडू पोरा नरोटे यांना दहशतवादी कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. २०२२ साली न्या. रोहित देव आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने तांत्रिक कारणांवरून साईबाबांची निर्दोष सुटका केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याची सूचना उच्च न्यायालयाला केली. यानंतर न्या. विनय जोशी आणि न्या. वाल्मीकी मेंनझेस यांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवण्यात आले.

हेही वाचा >>> नागपुरातील दिघोरी उड्डानपुलाला वाहतूक कोंडीचे ग्रहण; सुसाट जड वाहनांमुळे चौकात…

अखेर मंगळवारी साईबाबा यांना निर्दोष सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, २५ ऑगस्ट २०२२ रोजी नरोटे याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यामुळे उच्च न्यायालयात केवळ उर्वरित आरोपींचे अपील विचारात घेण्यात आले. साईबाबा हे बुधवारी कारागृहातून सुटणार अशी अपेक्षा होती. मात्र, कारागृहात न्यायालयीन आदेश आणि अन्य कागदपत्र यांची पूर्तता झाली नव्हती. त्यामुळे दोन दिवसांनंतर म्हणजेच गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रा. साईबाबा कारागृहाबाहेर आले. पत्नी आणि भावाने त्यांना कार मध्ये बसवले आणि घराकडे रवाना झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रिया देण्यास नकार

‘सध्या माझी प्रकृती व्यवस्थित नाही. त्यामुळे मी काहीही बोलू शकत नाही. मला उपचाराची नितांत गरज आहे. त्यामुळे मी रुग्णालयात जाऊन उपचार घेतल्यानंतरच बोलेल,’ अशी प्रतिक्रिया प्रा. साईबाबा यांनी कारागृहातून बाहेर येताच दिली. मध्यवर्ती कारागृहातून बाहेर येताच प्रसारमाध्यमांनी प्रा. साईबाबा यांची न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरुवातीला बोलण्यास टाळाटाळ केली. शेवटी त्यांनी प्रकृतीचे कारण देऊन बोलण्यास नकार दिला.