नागपूर : शहरातील जीएस महाविद्यालयाचे प्राध्यापक गजानन कराळे यांना माजी प्राचार्य आणि चार प्राध्यापकांनी मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बेलतरोडी पोलिसांनी माजी प्राचार्य एन. वाय. खंडाईत, बच्चू पांडे, भावना गट्टूवार, तौसिक पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. प्रा. कराळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या चौघांची नावे होती.

जीएस महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या ४२ वर्षीय गजानन कराळे यांनी ९ जुलैला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी डायरीत सुसाईड नोटही लिहिली व त्यात महाविद्यालय व्यवस्थापनाच्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे सांगितले. सुसाईड नोटमध्ये पाच-सहा प्राध्यापकांची नावे लिहिली होती. कराळे यांचे जावई नीलेश रोंधे यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसानी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली व त्यानंतर माजी प्राचार्य एन. वाय. खंडाईत, बच्चू पांडे, भावना गट्टूवार, तौसिक पठाण यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.  कराळे यांच्या नोकरीला १२ वर्षे झाली होती. वरिष्ठ वेतनश्रेणी मिळविण्यासाठी १२ वर्षांनंतर पात्रता परीक्षा घेतली जाते.

हेही वाचा >>> अकोला : घरासमोर खेळत असताना पुरात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह तीन दिवसांनी आढळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कराळे सोमवारी परीक्षेला बसणार होते. महाविद्यालय व्यवस्थापनाशी संबंधित शिक्षकांकडून त्यांना बऱ्याच दिवसांपासून धमक्या येत होत्या. कराळे यांचा एका महिला प्राध्यापकाशी वाद झाला. याप्रकरणी कराळे यांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. त्यांना सुटी घेण्यासदेखील मनाई करण्यात येत होती. यातून कराळे तणावात होते व अखेर त्यांनी त्यातूनच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या प्रा. कराळे यांच्या डोक्याला मार लागला होता. तसेच फरशीवर रक्ताचे डागसुद्धा होते, त्यामुळे प्रा. कराळे यांचा घातपात झाल्याचा संशयही वर्तविण्यात येत आहे.