गंगा जमुनात आरोग्य सेविका म्हणून सेवा; जागतिक एड्स दिन विशेष

नागपूर : उपराजधानीतील गंगा जमुना परिसरात मोठय़ा संख्येने मुली व महिला देहव्यवसाय करतात. यापैकी २३ वारांगणांनीच स्वत: आरोग्यसेविका म्हणून एचआयव्ही नियंत्रणाचा विडा उचलला आहे. त्या येथे विविध उपक्रम राबवत असल्याने येथे रुग्ण कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

नागपूर शहरातील बदनाम वस्ती म्हणून गंगा जमुनाकडे बघितले जाते. २०१४ पूर्वी येथे देहविक्री करणाऱ्या वारांगणांची संख्या पाच ते सहा हजार  होती. परंतु नंतर पोलिसांनी कारवाई केल्याने त्यातील निम्म्याहून अधिक वारांगणा देशाच्या विविध भागात गेल्या.  गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची कारवाई जास्तच वाढली. त्यामुळे ही संख्या आणखी खालावली. मध्यंतरी टाळेबंदी लागल्याने अनेकांवर उपासमारीची पाळीही आली होती. या वस्तीत वारांगणांसाठी अतिजोखीम गटातील प्रकल्प वर्ष २००० पासून सुरू झाला.

या प्रकल्पानुसार, एचआयव्ही नियंत्रणासाठी प्रत्येक वारांगणांची वर्षांतून दोन वेळा एचआयव्ही तपासणी होते. एचआयव्ही टाळण्याबाबतचे उपाय व जनजागृती सुरू झाली. काही वर्षांतच येथे एचआयव्ही बाधित वारांगणांची संख्या शंभरावर गेली. आजार आढळल्याने मानसिक धक्का बसलेल्या वारांगणांनी हा व्यवसाय सोडून इतर शहर गाठले. काहींचा मृत्यू झाला. सध्या येथे सुमारे ५० ते ७० महिलांना एचआयव्ही असून ते नित्याने औषधोपचार घेत आहेत. दरम्यान, या आजारावर नियंत्रणासाठी रेडक्रॉसने येथील २३ वारांगणांची स्वास्थ्य सेविका म्हणून मानधनावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे या वारांगणाच प्रत्येक इमारतीत देहविक्री करणाऱ्या या महिलांची जनजागृती, त्यांची वर्षांतून दोन वेळा एचआयव्ही तपासणी व वर्षांतून चार वेळा वैद्यकीय तपासणीसाठी मदत करतात. या प्रकल्पाला यश मिळत आहे. आता येथे वर्षांला एक ते दोन जणांहून अधिक वारांगणांमध्ये हा आजार आढळत नाही. या उपक्रमात रेडक्रॉस प्रकल्पातील इतरही कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संस्थांचीही मदत मिळत  आहे, अशी माहिती रेडक्रॉस नागपूरच्या प्रकल्प व्यवस्थापक हेमलता लोहवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. दरम्यान एड्सवरील जनजागृतीसह येथील सर्व महिलांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे आता सगळय़ाच एकमेकांना उपचारासह इतरही जनजागृतीपर उपक्रमात मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.