गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग ‘युगप्रवर्तक हेडगेवार’ रद्द करण्यात यावा व विद्यापीठातून एका विशिष्ट विचारसरणीचा प्रचार बंद करावा, या मागण्यांसाठी आज, सोमवारी (दि.३० जून) गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.
आदिवासी युवा परिषद, जंगो रायताड महिला समिती, वीर बाबुराव स्मारक समिती, अंधश्रध्दा निर्मुलन समिती तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
गोंडवाना विद्यापीठ हे शासनाचा निधी व विद्यार्थ्यांच्या क्षुल्कातून चालणारी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमध्ये एका विशिष्ट विचारप्रणालीचा प्रचार-प्रसार करणारे कार्यक्रम विद्यापीठाच्या निधीतून आयोजित करणे पूर्णतः चुकीचे व बेकायदेशीर आहे. जिल्ह्यातील दलित आदिवासी बहुजन व अल्पसंख्याक लोकांवर एक विशिष्ट विचार बळजबरीने थोपवण्याचा हा प्रकार आहे. हे भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचे उल्लंघन असून याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले व या विषयावर सविस्तर चर्चा केली.
आंदोलनात आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे, वीर बाबुराव समितीचे वसंतराव कुलसंगे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रशांत मडावी, जंगो रायताड समितीच्या कुसूम अलाम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. महेश कोपुलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे धर्मानंद मेश्राम, भाकपाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, राज बनसोड, नागसेन खोब्रागडे, हंसराज उराडे प्रकाश खोब्रागडे, संजय वाकडे, जलील शेख, रोहिदास फुलझेले, चुन्नीलाल मोटघरे, रामभाऊ काळबांधे, रिपब्लिकन पक्षाचे हंसराव उंदिरवाडे, प्रदीप भैसारे, प्रल्हाद रायपुरे, नरेंद्र रायपुरे, अंनिसचे विलास निंबोरकर, उमेश उईके, कल्पना रामटेके, मालता पुडो, लिना कोकोडे, आदी उपस्थित होते.