चंद्रपूर : तब्बल ३० वर्षांनंतर जिल्हा भाजपमध्ये महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अभिप्राय नोंदवण्यात आले. मात्र अभिप्राय नोंदणीत नाव नसतानाही महानगर जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासनगोट्टूवार यांची नियुक्ती झाल्याने जिल्हाध्यक्ष निवडीच्या अभिप्राय पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, अभिप्राय नोंदणी हा केवळ फार्स होता, अशी चर्चा आता भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे.

चंद्रपूर जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याने यावर्षी अभिप्राय पद्धतीने ग्रामीण व महानगर जिल्हाध्यक्ष निवडण्याचा कार्यक्रम भाजपने जाहीर केला. २९ एप्रिलला श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयात अभिप्राय नोंदविण्यात आले. यासाठी पर्यवेक्षक म्हणून आमदार अनिल सोले, ग्रामीणचे निरीक्षक माजी आमदार प्रवीण दटके, तर महानगराचे निरीक्षक अतुल दराडे होते. त्यांच्या उपस्थितीत अभिप्राय नोंदविण्यात आले.

ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी हरीश शर्मा यांना २६, माजी आमदार संजय धोटे यांना १२ अभिप्राय मिळाले.

महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी अभिप्राय नोंदणीत तत्कालीन महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांना १९, माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आणि तुषार सोम यांना प्रत्येकी ४ अभिप्राय मिळाले. शनिवारी भाजप जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा सर्वाधिक अभिप्राय मिळालेल्या पावडे यांच्या ऐवजी कासनगोट्टूवार यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांना धक्का बसला. यामुळे केवळ पदाधिकारी व मतदारांना दाखवण्यासाठीच अभिप्राय पद्धत राबविण्यात आली, असा आरोप होत आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत ओबीसींचे प्राबल्य आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही भाजपने जिल्हाध्यक्ष निवडीत ओबीसींना डावलल्याने, भाजपला ओबीसी चेहरा नकोच, अशी चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कासनगोट्टूवार नेमके कुणाचे समर्थक?

कधीकाळी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निष्ठावंत, अशी ओळख असलेले कासनगोट्टूवार सध्या आमदार किशोर जोरगेवार यांचे खंदे समर्थक आहे. जोरगेवार यांचे राजकीय विरोधक राहिलेले माजी आमदार नाना शामकुळे यांच्याशीही कासनगोट्टूवार यांनी कधीकाळी निष्ठा बाळगली होती. मात्र, शामकुळे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मुनगंटीवार यांच्याशी जवळीक साधली होती. त्यानंतर पुन्हा जोरगेवार यांचा हात पकडला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्याही गटात ते कधीकाळी सक्रिय होते. त्यामळे कासनगोट्टूवार नेमके कुणाचे समर्थक, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यांच्या ‘फेसबुक’वर आजही त्यांनी मुनगंटीवार यांनाच नेते म्हणून स्थान दिले आहे.