चंद्रपूर : विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणुक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राज्यात आणि देशात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आरोपामुळे राजुरा विधानसभा मतदार संघात झालेले बोगस मतदार नोंदणीचे प्रकरण पून्हा एकदा समोर आले आहे. तर चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील पिपरी गावात एका झोपडीवजा घरात तब्बल शंभर मतदार आढळून आले आहेत. हे सर्व मतदार बोगस असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, ही चूक निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी यंत्रणेची असल्याचे सांगण्यात येत आहे.

घुग्घूस शहर कॉग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी घुग्घूस आणि पिपरी येथील एकाच खोलीत शंभरावर मतदार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. याबाबत सत्यता तपासल्यानंतर रेड्डी यांचा दावा अंशतः सत्य असल्याचे समोर आले. पिपरी येथील घर क्रमांक ३७५ हे अरुणा मच्छिंद कोटवाडे यांच्या मालकीचे आहे. त्यांचे घर म्हणजे एक झोपडीच आहे. त्यांना दोन मुले असून त्यांची नावे मतदार यादीत नाहीत. कोटवाडे दाम्पत्याची नावे मात्र मतदार यादीत आहेत. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

तरीही त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल शंभर मतदारांची नोंदणी झाली आहे. यामुळे रेड्डी यांच्या दाव्यानंतर मतचोरीच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, कोटवाडे यांच्या घराच्या पत्त्यावर नोंदविलेल्या सर्व मतदारांची तपासणी केल्यानंतर हे मतदार गावातीलच असल्याचे आणि ते हयात असल्याचे स्पष्ट झाले. पिपरी गावात एकूण १,४१२ मतदार आहेत. हा बोगस मतदारांचा प्रकार नसून, मतदार नोंदणी करताना कर्मचाऱ्यांनी घोळ घातल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या झोपडीतील “सर्व मतदार गावातीलच आहेत. त्यांचा पत्ता एकच नोंदविला गेला आहे. मात्र, हा बोगस मतदारांचा प्रकार नसून यंत्रणेची चूक आहे.” असा दावा भाजप कार्यकर्ते तथा गावचे माजी सरपंच व चंद्रपूर बाजार समितीचे सदस्य पारस पिंपळकर यांनी केला आहे.