नागपूर : सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०३ वा वार्षिक ऊर्स ताजाबाद शरीफ येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयातून दरबारी शाही संदल आज, मंगळवारी काढण्यात येणार आहे. संदल ताजाबादच्या बुलंदद्वार येथून निघाल्यानंतर उमरेड रोड, शीतला माता मंदिर, सक्करदरा चौक, अशोक चौकपासून महाल, इतवारी, गांधीबागच्या ज्या मार्गावरुन बाबा ताजुद्दीन आपल्या जीवनकाळात फिरले त्या मार्गाने फिरविण्यात येईल. बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उरूस नागपुरातील ताजाबाद येथे सुरू आहे. यानिमित्त येथे देशभरातून भाविक येत असल्याने गर्दी होत आहे. ती टाळण्यासाठी अजनी आणि मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर फलाट विक्री बंद करण्यात आली आहे.

प्रवाशांची सुरक्षित आणि सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी लागू केली आहे. ही बंदी २२ ते २५ जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे. तथापि, विशेष परिस्थितींमध्ये ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, महिला प्रवासी, मुले, अशिक्षित प्रवासी व अशा इतर प्रवाशांना मदतीसाठी येणाऱ्या व्यक्तींना फलाट तिकिटे दिली जातील. याबाबत स्थानक अधीक्षकांना योग्य निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक जनजागृतीसाठी आवश्यक घोषणा केल्या जातील तसेच सर्व माहिती फलकांवर सूचनाफलक लावले जातील. स्थानक कर्मचारी व अधीक्षकांना हे उपाय प्रभावी व सौजन्यपूर्ण रीतीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मिरवणुकीत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून, या मार्गावरची सर्व प्रकारची वाहने पर्यायी मार्गावर वळवली जाणार आहेत. संदल मिरवणुकीदरम्यान तीनगल चौक ते शहीद चौक एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. या मार्गावर संदल मिरवणूक व दुचाकी वाहने सोडून इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. बंद केलेल्या मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गावर वळवण्यात येत आहे.

संबंधित चौक येणारी वाहतूक ही वेळेनुसार इतरत्र पर्यायी मार्गावर वळवण्यात येईल. आवश्यकतेनुसार इतरत्र वाहतूक वळवण्याचे अधिकार वाहतूक शाखा पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी जारी केलेल्या परिपत्रकातून स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मार्गावर वाहतूक बदल

 नागपूरकडून उमरेडकडे जाणाऱ्या बसेस व इतर वाहतूक बैद्यनाथ चौक, मेडिकल चौक, क्रीडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा चौक, म्हाळगीनगर चौक, चामट चक्की चौक मार्गे उमरेड रोडचा वापर करतील.