गडचिरोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे २३ मार्ग बंद झाले असून शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आलापल्ली-सिरोंचा या प्रमुख मार्गासह २३ मार्ग बंद झाले आहे. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शनिवारी सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काल देसाईगंज येथे एका डीपीवर वीज कोसळल्याने अनेक नागरिकांच्या घरचे फ्रीज, टीव्ही व विजेवर चालणारी इतर उपकरणे निकामी झाली. मागील चोवीस तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ११९.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल देसाईगंज तालुक्यात ९६ मिलीमीटर पाऊस पडला. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: तेलंगणा राज्य आणि लगतच्या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना शनिवारी २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.