नागपूर: मुंबईनंतर नागपूर जिल्ह्यातील काही भागातही आता पावसाचा तडाखा सुरू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर येथील काही गाय व बकरीही वाहून केल्याची माहिती पुढे येत आहे. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर जिल्ह्यात मध्यंतरी पावसाने उसंती दिली होती. परंतु आता चांगला पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले. तर जलालखेडा येथील पुनर्वसन परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील शेकडो एकर शेतातील पीके पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या भागातील शेतीत सोयाबीन, तूर, कपासी, संत्रा, मोसंबी व फळ भाज्यांची लागवड केली जाते. पुरामुळे या पिकांचे नुकसान झाले.
मंगळवारी दुपारच्या पावसामुळे जलालखेडा, मदना भारसिंगी, वाढोणा, मेंढला, सिंजर, थडीपनी,जामगाव, देवग्राम, मुक्तापूर, महेंद्री तसेच नरखेड तालुक्यात मुसळधार पाउस झाला. त्यामुळे या भागातील नदी- नाल्यांना पुर येऊन शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. पावसाचे पाणी जलाखेडा येथील पुनर्वसन येथील नागरिकांच्या घरातही शिरले. त्यामुळे नागरिकाचे नुकसान झाले आहे. सामान्यांचे झालेले नुकसान बघता शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी व गावकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान येत्या काळात काही दिवस आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान वाढण्याचीही शक्यता आहे. पावसाच्या तडाख्यात परिसरातील शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाकडून आवश्यक प्रक्रिया करून भरपाई मिळणार काय? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जलालखेडा ते मुक्तापूर मार्ग बंद…
नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील मुक्तापूर जाणाऱ्या मार्गावर जुनी वस्ती परिसरातून जाणाऱ्या नाल्यालाही पुर होता. त्यामुळे पुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली. त्यामुळे येथील वाहतूक भारसिंगी मार्गे वळवण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली.
गायीचा मृत्यू, बकऱ्या वाहून गेल्या…
नारसिंगी ते मोहनपुर (रिठी) या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात बबन विश्वनाथ वाटकर यांचे २ बोकड आणि ५ बकऱ्या वाहून गेल्या. हेमाराज रामराव काकडे यांची गाय मरण पावली आणि परिसरातील शेतीला तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र होते.