अमरावती : शहराच्या वाहतुकीचा कणा असलेला राजकमल चौक रेल्वे उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहचल्याने या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक रविवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. पोलिसांनी कठडे लावून हा पूल कायमस्वरूपी बंद केला.

प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता राजकमल चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एकीकडे गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांना वेठीस धरण्यात आले, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी याविषयी बोलायला तयार नाहीत, असा आरोप करीत युवक काँग्रेसने २९ ऑगस्ट रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यासंदर्भात जाब विचारणार असल्याचे सांगितले आहे.

जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. परंतु त्या मार्गावरून वाट काढताना प्रत्येक चौकात किमान अर्धा तास थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रागा होत असून ते प्रत्येक राजकीय पक्षाला याचा जाब विचारत आहेत.

हाच लोकक्षोभ लक्षात घेता काँग्रेसचे मुन्ना राठोड व समीर जवंजाळ यांनी पालकमंत्र्यांना लक्ष्य केले. त्यांच्या मते उड्डाणपूल वाहतूक योग्य नाही, ही माहिती एका रात्रीतून पुढे आली नाही. वेळोवेळी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येच ही माहिती दिली होती. त्यामुळे योग्य उपाययोजना सुरू केली असती तर आज ही वेळ ओढवली नसती. त्यामुळे हे शासन-प्रशासनाचे अपयश असून, ते झाकण्यासाठी जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला.

नव्या पुलाच्या बांधकामाबाबत पालकमंत्र्यांनी स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणीही यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. उड्डाणपुलाच्या कामाला अद्यापही शासनाकडून अधिकृतपणे मान्यता देण्यात आलेली नाही. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रशासनाने हा पूल बंद केला आहे.

राजकमल चौकातील उड्डाणपूल हा जीर्ण झाल्याचे पत्र बांधकाम विभागाकडून २०२३ मध्येच शासनाकडे देण्यात आले होते. त्यावेळी २५० कोटींच्या निधीची गरज दर्शविण्यात आली, मात्र तरीसुद्धा शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी कुठलाही पाठपुरावा केला नाही आणि आता अचानकपणे शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यापारी संघटना, वाहतूकदार संघटना यांच्याशी कुठलीही चर्चा न करता प्रशासनाने अचानकपणे मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून मनमानी केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

जर हा उड्डाणपूल क्षतिग्रस्त आणि धोकादायक आहे तर त्या पुलाखालून जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुरक्षित कशा?, रेल्वे प्रवाशांचे जीव धोक्यात नाहीत का? असा सवाल मुन्ना राठोड यांनी उपस्थित केला. यावेळी अनिकेत ढंगळे, योगेश बुंदिले आदी पदाधिकारी उपस्थित होते.