चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच राज्याच्या निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्हा प्रशासन तथा पोलीस विभागाला तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरा येथील बोगस मतदार नोंदणीच्या प्रकरणाला देशपातळीवर वाचा फोडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पराभूत उमेदवार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी हे प्रकरण लावून धरले. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे या दोन्ही नेत्यांनी सातत्याने पत्र देवून आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक डेटा आणि तांत्रिक माहिती मागवावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती उपब्ध करून द्यावी, अशी विनंती केली होती.

‘लोकसत्ता’नेही २२ सप्टेंबरला पोलिसांनी पाच वेळा पत्र लिहून ‘डेटा’ मागितल्यानंतरही आयोग माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या माहितीच्या आधारावर पोलिसांना आता बोगस मतदार नोंदणी नेमकी कुणी केली, त्यांच्यापर्यत सहज पोहचता येणार आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी मात्र यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार देत आहेत.