चंद्रपूर : राजुरा नगरपालिकेत काँग्रेस व शेतकरी संघटनेतील आघाडीची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. यास शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप आणि माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेसकडून धोटे हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील. नगराध्यक्षाची निवडणूक ‘पंजा’ चिन्हावर, तर २१ नगरसेवकपदाचे उमेदवार ‘कॉमन’ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. धोटेंच्या उमेदवारीने भाजपसमोर तगडे आवाहन निर्माण झाले आहे. यामुळे भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची चर्चा आहे.

राजुरा नगरपालिकेची सत्ता काबीज करण्याचे मोठे आव्हान भाजप आमदार देवराव भोंगळे यांच्यासमोर आहे. त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि शेतकरी संघटनेने आघाडी केली आहे. भाजपमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत सहमती झालेली नाही. यामुळे भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार धोटे यांनी तीनवेळा नगराध्यक्षपद भूषवलेले आहेत.

मागील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेने जास्त मते घेतली होती. २०१६ मध्ये काँग्रेसला ९, शेतकरी संघटनेला ४, भाजपला ३ व अपक्ष २ उमेदवार विजयी झाले होते.

‘विकासाचा पत्ता, महिलांच्या हाती सत्ता’

बल्लारपुरात भाजप आणि काँग्रेसकडून ‘विकासाचा पत्ता, महिलांच्या हाती सत्ता,’ असा प्रचार सुरू आहे. बल्लारपूर नगरपालिकेत नगराध्यक्षपद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. १७ प्रभागांतून ३४ नगरसेवकांपैकी १७ महिला नगरसेवक होणार आहेत. जिल्ह्यात बल्लारपूर नगरपालिका सर्वात मोठी असून मतदारांची संख्या ८४ हजारांच्या आसपास आहे. औद्योगिक शहर, दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आणि ‘मिनी भारत’, अशी बल्लारपूरची ओळख आहे. जागतिक दर्जाचा बिल्ट ग्राफिक पेपर उद्योग समूह येथे आहे. त्याला जोड मध्य चांदा वन विभागाच्या काष्ठ भंडाराची मिळाली आहे.