नागपूर : उपराजधानीतील रामनगर चौकातील हनुमान मंदिर परिसरात शनिवारी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ‘हनुमान चालीसा’ पठण केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ‘हनुमान चालीसा’ पठणाचा इशारा दिल्यानंतर राजकीय नाटय घडून आले होते. तेव्हापासून तब्बल ३६ दिवस राणा दाम्पत्य विदर्भाबाहेर होते. ते शनिवारी अखेर नागपुरात परतले. यावेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. त्यांनी नागपुरात येण्याआधीच रामनगर चौकातील हनुमान मंदिरात ‘हनुमान चालीसा’ पठण करण्याचे जाहीर केले होते. 

राणा दाम्पत्याला आव्हान देण्यासाठी  नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसनेही येथे केंद्र सरकारच्या विरुद्ध भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली होती. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

हनुमान चालीसाबाबत राजकारण नको – फडणवीस

कुणी हनुमान चालीसा पठण करत असेल तर ते रोखता येत नाही. कोणी जर रोखत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे या संदर्भात राजकारण केले जाऊ नये. ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांना करू द्या, असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.  फडणवीस शनिवारी नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राणा दाम्पत्याच्या समर्थनार्थ लागलेल्या फलकावर भाजपच्या मोठय़ा नेत्यांचे छायाचित्र होते. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, फलक जर सकारात्मक आहे तर काही हरकत नाही.

सर्व धर्माचा आदर – पटोले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल  आणि फक्त हाच प्रश्न महत्त्वाचा आहे, असे वाटत असेल तर यात काँग्रेसला काहीही बोलायचे नाही. आम्ही धर्माचा आदर करतो, राणांची जाहिरात नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आपले मत मांडले. पटोले काँग्रेसच्या सोशल मिडिया शिबिराच्या उद्घाटनासाठी शनिवारी नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.