शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपांचीही चर्चा सुरू झाली आहे. कुख्यात युसूफ लकडावाला याचे राणा दाम्पत्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केला होता. आता, राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

लकडावाला याचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध –

युसूफ लकडावालाकडून नवनीत राणांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. राणा दाम्पत्याने मात्र हे आरोप फेटाळून लावले. दुसरीकडे, हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक अफरातफरीशी निगडित असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार का? असा सवाल राऊत यांनी केला होता. राऊत यांनी नवनीत राणा यांच्या निवडणूक शपथपत्रातील कागदपत्रांच्या आधारे हे आरोप केले. लकडावाला याचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध होते. अनेक गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांशी त्याचा संबंध होता. तुरुंगात असतानाच तो मरण पावला. राणा यांनी लकडावालाकडून ही रक्कम कर्जरूपाने का व कशासाठी घेतली?, त्याच्याशी काय संबंध होते?, असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले होते.

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते –

नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रातील जंगम मालमत्तांच्या तपशीलात गुंतवणुकीविषयीच्या रकान्यात क्रमांक ३ वर युसूफ लकडावाला – ८० लाख रुपये असा उल्लेख आहे. याआधारे संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर आरोप केले. युसूफ लकडावालाची ‘ईडी’ने चौकशी केली तेव्हा त्यांना हे संबंध दिसले नाहीत काय़, असा सवालही राऊत यांनी केला होता. त्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे आता काय होणार? –

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. आमदार रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत. राणा दाम्पत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने लक्ष्य केले. त्याचा राजकीय लाभ त्यांना मिळू शकतो, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे आता काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्यावरील आरोप खोटे – रवी राणा

“आमच्यावरील आरोप खोटे आहेत. आम्ही युसूफ लकडावाला याला ओळखतही नव्हतो. तो एक बांधकाम व्यावसायिक होता. त्याने बांधलेल्या गृह प्रकल्पातील एक सदनिका इतर लोकांप्रमाणे आम्ही विकत घेतली. या प्रकरणात पोलिसांनी ‘एसआयटी’मार्फत चौकशी केली आणि ही ‘फाईल’ बंद देखील झाली आहे. संजय राऊतांना पुरावे सादर करता आले नाही, आरोप केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तेही काही बोलू शकले नाहीत.” असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.