कौटुंबिक वाद पुन्हा चव्हाटय़ावर
नागपूर : माजी मंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांच्या कुटुंबातील वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यांचा मुलगा डॉ. अमोल देशमुख याच्याविरुद्ध आता उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून घरातील अतिक्रमण रिकामे करून देण्याची विनंती केली आहे
रणजीत देशमुख हे जीपीओ चौकातील मातोश्री बंगल्यात राहतात. त्यांना आमदार डॉ. आशीष देशमुख व डॉ. अमोल देशमुख ही दोन मुले असून त्यांचेही वेगवेगळे बंगले आहेत. मात्र, डॉ. अमोल हे आपल्या कुटुंबासह मातोश्रीमध्येच राहतात. यासंदर्भात देशमुख यांनी डॉ. अमोल यांना अनेकदा घर सोडण्यास सांगितले. मात्र, त्यांनी घर सोडले नाही. त्यांनी खोलीला ४ मे रोजी कुलूप लावले. मात्र, डॉ. अमोल यांनी ते कुलूप तोडले व आत प्रवेश केला. अखेर त्यांनी सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली होती. सीताबर्डी पोलिसांनी त्यांचा तक्रारअर्ज चौकशीसाठी स्वीकारला. त्यानंतर बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण समोपचाराने मिटवण्यात आले. मात्र,आता पुन्हा रणजित देशमुखांनी न्यायदंडाधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करून मुलाने घरात केलेले अतिक्रमण काढण्याची विनंती केली आहे. देशमुख यांच्यावतीने अॅड. मसूद शरीफ हे काम पाहात आहेत.