अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली असून या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर पुणे, तर तिसऱ्या स्थानावर नागपूर आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईत सर्वाधिक ३२५ तर, पुण्यात ८९ बलात्काराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या गुन्हे अहवालातून समोर आली.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईत ३२५ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. यात मार्च महिन्यातील सर्वाधिक ९० गुन्हे आहेत. जानेवारी (७८), फेब्रुवारी (६०) आणि एप्रिल महिन्यांत ७९ गुन्हे दाखल झाले. पुणे शहरात बलात्काराच्या ८९ घटना घडल्या. जानेवारीत सर्वाधिक २८ बलात्कारांची नोंद झाली. फेब्रुवारी (२४), मार्च (१३) आणि एप्रिलमध्ये २४ घटना घडल्या. नागपुरात गेल्या साडेचार महिन्यांत ८५ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. एप्रिल महिन्यात सर्वाधिक २६ बलात्काराच्या घटना घडल्या. फेब्रुवारीत सर्वात कमी १४ बलात्कारांची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिक, औरंगाबाद शहरांचा क्रमांक लागतो.
निकटवर्तीयांकडून शोषण
आरोपींमध्ये सर्वाधिक प्रियकर आणि नातेवाईकांचाच समावेश आहे. अनेकदा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले जातात. लग्नास नकार मिळाल्यामुळे बलात्काराची तक्रार देण्यात येते. अनेकदा जवळचे नातेवाईकच महिलांशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवतात. संबंध बिघडल्यानंतर किंवा कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर बलात्कार झाल्याची तक्रार दिली जाते.
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांसंदर्भात विशेष समिती स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक यांनाही घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. कनिष्ठ पोलीस अधिकारी बलात्कारासारख्या घटनांचा तपास व्यवस्थित करीत नाहीत. त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत नाही. याबाबत पोलिसांनी गांभीर्य दाखवायला हवे. – आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग